सोमवार, २७ जानेवारी, २०२०

जागल्या आता वेबसाईटवर...

जागल्या
 सस्नेह नमस्कार,
गेल्या वर्षभर 'जागल्या' या ब्लॉगवर आपण सतत प्रेम दाखवले आहे. यावर प्रसिद्ध झालेल्या विविध विषयांवरील लेखमालेवर आपण भरभरून प्रेम केले. वेळोवेळी सूचना, मार्गदर्शनही केले आहे. आपल्या या प्रेमापोटी आम्हाला आणखी नवीन काहीतर करण्यासाठी बळ मिळाले. याचाच एक भाग म्हणून काल 26 जानेवारी 2020 रोजी कष्टकऱ्यांचे नेते म्हणून सर्वज्ञात असलेले आदरणीय डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते 'जागल्या' या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. आता जागल्याचा नवीन लोगो, अधिकृत वेबसाईट वरीलप्रमाणे असेल. जागल्यावर तुम्हीही आता लिहू शकता, बोलू शकता. आपल्या शोधक लेखमालेला, नवीन पुस्तकांना प्रसिद्धी देऊ शकता. आपल्या नाविन्यपूर्ण बातमी, माहितीलाही प्रसिद्धीस देऊ शकता. त्यासाठी आम्हाला खालील मेलवर संपर्क करू शकता.
जागल्याच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी क्लिक करा...

'जागल्या' वेबसाईटचे प्रकाशन करताना डॉ. बाबा आढाव आणि 'जागल्या'चे संपादक दीपक जाधव, संदीप कांबळे व जागल्या टीमवर प्रेम करणारे श्री. नितीन पवार, राहुल वाणी, अमोल, व श्रीकांत मिश्रा...

शुक्रवार, ३ जानेवारी, २०२०

सावित्रीबाईला असेही अभिवादन - डॉ. संजय चाकणे आणि नंदिनी जाधव

ज्ञानाई

बयो सावित्री
आमची मोठ्याई,
तूच खरी ज्ञानाई,

तुझी महती
सांगताना
तुला अडकवतात
शेण्या, साडी,
यातच गोष्टीरूप,

पण तुझं महत्तम कार्य
कळण्यासाठी,
केवळ तसबिरित्  न अडकवता
काव्य फुलांच पूजन झाले पाहिजे,
त्याची गाणी झाली पाहिजेत,
ती ओठी सहजी गायली गेली पाहिजेत,

सुबोध रत्नाकराचे पवाडे गायले पाहिजेत
सहजी ओठी गुणगुणले पाहिजेत,

हे माते,
हे माई,
हे कवियित्री,
हे ज्ञानाई ,
तू नसतीस तर
????????
आज,
कन्या शिकल्या असत्या का?
पंतप्रधान ते राष्ट्रपती
संशोधक ते अंतराळ
पायलट ते डॉकटर झाल्या असत्या का?

तुला मूर्तीत अडकवनारे,
तुझे पुतळे उभे करत
पूजा बांधून कर्मकांडात
अडकवनारे आम्ही ,
करंटे तर नाही ना?

तुझ्या ज्ञानपिपासू वृत्तीपासुन,
दूर तर जात नाही ना?

बयो तुला समजून घ्यायला काही तपं लागतील'
पण
तुला समजुन घ्यावचं लागेल '
माते सावित्री '
तुझ्या विचाराना पुढ न्यावेच लागेल .
आम्ही ते नेणारच.
विनम्र अभिवादन .

प्राचार्य डॉ. संजय चाकणे (इंदापूर, पुणे)
३ जाने २०२०
----------------------------------------------

नंदिनी जाधव
नंदिनी जाधव हे सामाजिक कार्यात विशेषतः जटा निर्मूलन कार्यात वाहून घेतलं एक आघाडीचे नाव. त्यांनी आज सावित्रीबाई यांच्या जन्मदिनी 151 व्या जटेचे फुल्यांचं जन्मगाव खानवडी मध्ये निर्मूलन केले.

व्हिडीओ बघण्यासाठी क्लिक करा.
https://youtu.be/7csPaEs-6Wc


शुक्रवार, २० डिसेंबर, २०१९

कोण आहेत हे महापुरुष...

या महापुरुषाचा एकुलता एक मुलगा जेंव्हा वारला तरी त्यांच्या डोळ्यातुन अश्रुंचा एक थेंब सुद्धा आला नाही, यावर ते म्हणतात, "ऐसे किती गेले कोट्याने, का रडु एकासाठी..." पण ६ डिसेंबर १९५६ रोजी जेंव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले, तेंव्हा हा महापुरुष सतत १४ दिवस रडत राहिला, आणि १५ व्या दिवशी म्हणजेच २० डिसेंबर १९५६ रोजी त्यांचेही महापरिनिर्वाण झाले.
डॉ. आंबेडकर आणि हा महान समाजसुधारक आदर्श गुरु शिष्यांची जोडी म्हणून सर्व परिचित आहेत. डॉ. आंबेडकर आणि हा युगपुरुष या दोन्हीही महापुरुषांना त्रिवार वंदन...
आज या महापुरुषाचा स्मृतिदिन...
#कोण आहे हा महापुरुष वाचण्यायासाठी या लिंकवरटिचकी मारा...

गुरुवार, १९ डिसेंबर, २०१९

लाख मोलाच्या भेटीची गोष्ट... ॲड. दिग्विजय ठोंबरे

 डॉ. श्रीराम लागू 
वडिलांची बदली पुण्याला झाल्याने स्वारगेट पोलीस लाईन मध्ये राहण्यास नुकतंच आलो होतो.पुण्याबद्दल बरच ऐकून होतो पण यावेळी मात्र पुण्यात वास्तव्यासच असल्याने जे ऐकून होतो ते प्रत्यक्ष पाहण्याची व अनुभवण्याची संधी प्राप्त झाली होती. याच संधीचा मी पुरेपूर फायदा उठवत असताना पुण्यामध्ये चालत, पीएमटीने, गाडीवर भरपूर फिरलो. स्वारगेट पोलीस लाईन जवळच गणेश कला क्रीडा मंच असल्याने तिथे आयोजिलेल्या भरपूर कार्यक्रमास हजेरी लावली व मनसोक्त आनंद लुटला.असच एक दिवशी गणेश कला क्रीडा मंच कडे जात असताना त्याच्या बाजूलाच असलेल्या मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स च्या बाहेर गर्दी दिसली व पावले आपसूकच तिकडे वळली.उत्सुकतेपोटी गर्दी जमण्यामागील उद्देश जाणून घेत असताना एका गृहस्थाकडुन समजले की येथे पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आहे व त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. श्रीराम लागू येणार आहेत. ज्या व्यक्तिमत्वास आतापर्यंत विविध चित्रपटात पाहिले व नाट्य,चित्रपट सृष्टीमध्ये ज्यांनी आपल्या कसदार अभिनयाने आपली स्वतःची विशेष अशी एक ओळख निर्माण केली अश्या डॉ. श्रीराम लागू सरांस भेटण्यासाठी  सभागृहात मोक्याची जागा पटकवून मी सरांची वाट पाहू लागलो.थोड्याच वेळात लागू सरांचे प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात आगमन झाले.मी त्या टाळ्यांच्या कडकडाटास हातभार लावत असताना थोडी देखील कसूर केली नाही.लागू सरांस प्रत्यक्ष पाहताना होत असलेला आनंद त्याच्या परिसीमेचे उल्लंघन करत होता. व्यासपीठाकडे जात असताना ते एका मुलाच्या खांद्यावर हात टाकून हळू हळू चालत होते. वय झाल्याने त्यांनी त्या मुलाच्या खांद्याचा आधार घेतला होता. पुढे कार्यक्रम उत्तम पार पडला. त्यामध्ये लागु सरांनी भाषण करीत असताना स्पष्ट व परखडपणे त्यांची मते मांडली व ती मांडत असताना सद्यपरिस्थिवर जोरदार प्रहार केला. कार्यक्रम संपताच श्रीराम लागू सर व्यासपीठावरील उपस्थित एका व्यक्तीच्या मदतीने व्यासपीठावरून खाली आले व त्या मुलाची वाट पाहू लागले की ज्याच्या खांद्यावर हात ठेवून ते व्यासपीठापर्यंत गेले होते. ही गोष्ट माझ्या लक्षात आली व गर्दीतून वाट काढत मी लागू सरांपर्यंत पोहचलो. प्रथम त्यांच्या पाया पडलो व त्या मुलास उशीर होत असल्याचे पाहून मी लागू सरांस म्हणालो,

"चला सर मी सोडतो तुम्हाला गाडीपर्यंत"
त्यांनी देखील त्या मुलाचे काहीतरी नाव घेऊन "कुठे गेला तो?" असा प्रश्न केला व माझ्या खांद्यावर हात ठेवला व आम्ही दोघ त्या सभागृहातून चालू लागलो. सभागृहातील व्यक्तींला असे वाटत होते की मी त्यांचाच माणूस आहे. त्यावेळी माझं पूर्ण लक्ष हे त्यांनी माझ्या खांद्यावर ठेवलेल्या हाताकडे व त्यामुळे होणाऱ्या स्पर्शाच्या जाणिवेकडे होत.हळूहळू चालत आम्ही त्यांच्या गाडीपर्यंत आलो.तो मुलगा गाडीजवळच उभा होता त्याच्या मदतीने लागू सर गाडीमध्ये बसले त्यावेळी मी त्यांस त्यांची स्वाक्षरी एका कागदावर मागितली असता ते म्हणाले,

"आता हात थरथर कापतो त्यामुळे स्वाक्षरी करता येत नाही"

मी म्हणालो,

"सर तुम्हाला पुन्हा कुठे भेटता येईल?"

त्यावर त्यांनी त्यांच्या सोबत असलेल्या मुलास

"यांला घरचा पत्ता व संपर्क क्रमांक दे"

असे सांगितले.स्वाक्षरीसाठी हातात असलेल्या कागदावरच पत्ता व फोन नंबर मी लिहून घेतला व त्यांची गाडी तिथून निघून गेली.
एवढीच काय त्यांची अन माझी अल्पशी ओळख. श्रीराम लागू सरांसोबत थेट संपर्क साधता आल्याच्या आनंदात मी घर गाठले.
पुढे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे एम एस सी साठी प्रवेश मिळाल्याने मी राहुरीला गेलो. एखाद्या सणाचे औचित्य साधून मी लागू सरांस अधून मधून फोन करून शुभेच्छा देत असे.एकदा त्यांच्या वाढदिवसाला फोन करून शुभेच्छा देताना मी म्हणालो,

"सर तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो."

त्यावर ते म्हणाले,
"ईश्वर चरणी प्रार्थना करून जर उत्तम आरोग्य लाभत असत तर दवाखाने कश्यासाठी निघाले असते."
त्यांच हे वाक्य ऐकून माझ्या हातातील फोन खाली पडायचंच बाकी होत. पण ज्या ज्या वेळी मी त्यांच्याशी बोलत असे त्या त्या वेळी एक वेगळाच आनंद अनुभवयास मिळत असे. मी नेहमी फोन करत असल्याने त्यांच्याशी जवळीक साधता आली. त्यांचे शब्द ऐकण्याचे भाग्य माझ्या कानास प्राप्त झाले.लागू सरांच्या घरातील व्यक्ती त्यांस "दादा" या नावाने संबोधत असल्याने मी देखील ज्यावेळी त्यांस फोन करत असे त्यावेळी "दादा आहेत का, त्यांच्याशी बोलायचं होत" अशी इच्छा प्रदर्शित करत असे.घरातील व्यक्ती देखील खासकरून त्यांच्या पत्नी दीपा लागू मॅडम या सरांच व माझं बोलणं करून देत असत.फोन वरून का असेना परंतु डॉ. लागू सरांसोबत असलेली माझी ही ओळख मला प्रचंड उर्जा देऊन गेली.वकील झाल्यावर लागू सरांस प्रत्यक्ष भेटून या नटसम्राटाच्या पायाशी लीन होऊन त्यांचे आशीर्वाद घेण्याची ओढ मला लागली होती.त्या ओढीतूनच मी मागील महिन्यात फोन केला असता दीपा लागू मॅडम म्हणाल्या,

"दादा सध्या आजारी आहेत,ते समोर आलेल्या व्यक्तीला ओळखत देखील नाहीत तेव्हा तुम्ही थोड्या दिवसानंतर फोन करून भेटायला या"

मी वाट पाहत होतो त्यांची तब्बेत ठीक होण्याची परंतु काल ते गेल्याची बातमी समजताच डोळ्यात पाणी तर आलच पण या नटसम्राटाला भेटायचं राहूनच गेलं अस वारंवार वाटू लागलं.
डॉ.श्रीराम लागू सर यांस भावपूर्ण श्रद्धांजली व सलाम

अॅड.दिग्विजय.ठोंबरे*

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१९

अत्र्यांच्या अग्रलेखातले बाबासाहेब... व्वा अत्रे तुमची लेखणी ग्रेटच.

6 डिसेंबर 1956 ला डॉ. आंबेडकरांचे महानिर्वाण झाले. आज या घटनेला 63 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानंतर अत्र्यांनी 'मराठा'तून सतत 12 दिवस बाबांच्या जीवनावर आणि तत्त्वज्ञानावर अग्रलेख लिहिले. त्यातील हा '7 डिसेंबरचा पहिला अग्रलेख'.

गुरुवार, दिनांक 6 डिसेंबर 1956, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं दिल्लीत निधन झालं. सारा देश दु:खात बुडाला. मुंबईत बाबासाहेबांची प्रचंड महायात्रा निघाली. अंत्यविधीच्या वेळी श्रद्धांजली पर भाषण फक्त एका व्यक्तीचं झालं. ते होते आचार्य अत्रे.....!!!

अत्र्यांचं ते भाषण इतिहासात अजरामर झालं आहे. त्यानंतर अत्र्यांनी 'मराठा' तून सतत 12 दिवस बाबांच्या जीवनावर आणि तत्त्वज्ञानावर अग्रलेख लिहिले. त्यातील हा '7 डिसेंबरचा पहिला अग्रलेख'.
"सात कोटी अस्पृश्य आज पोरके झाले. भारतातल्या अस्पृश्याचां आणि अपंगांचा आज आधार गेला. शतकानु शतके समाजाने लाथाडलेल्या पतितांचा पालनहार गेला. दीनदुबळ्या दलितांचा कनवाळू कैवारी गेला. जुलमी आणि ढोंगी विषमेविरुद्ध जन्मभर प्राणपणाने झगडणारा झुंझार लढवय्या गेला. सामाजिक न्यायासाठी आणि माणुसकीच्या हक्कासाठी ज्यांनी जगभर आकाशपाताळ एक केले असा बहादूर बंडखोर आज आमच्यामधून निघून गेला. पाच हजार वर्षे हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे एक बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते."

"आंबेडकर म्हणजे बंड-मूर्तिमंत बंड. त्यांच्या कणाकणांतून बंड थैमान घालत होते. आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुद्ध उगारलेली वज्राची मूठ होय. 

आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव सिद्ध असलेली 'भीमा'ची गदा होय.

आंबे़डकर म्हणजे जातिभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र होय. 

आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडांच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्याची आतडी बाहेर काढणारी वाघनखे होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध सदैव पुकारलेले एक यु्द्धच होय."

"महात्मा फुले, कबीर आणि भगवान बुद्ध" हे तीन गुरूच मुळी आंबेडकरांनी असे केले, की ज्यांनी देवाचे, धर्माचे, जातीचे आणि भेदांचे थोतांड माजविणाऱ्या समाजव्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले.
पतित स्त्रियांच्या उद्धाराचा प्रयत्न करणाऱ्या महात्मा फुल्यांवर हिंदू समाजाने मारेकरी घातले. कबिराला हातपाय बांधून पाण्यात टाकण्यात आले. ह्त्तीच्या पायी देण्यात आले आणि मग तो मेल्यानंतर हिंदू-मुसलमानांना त्याच्याबद्दल एवढे प्रेम वाटू लागले की, त्याच्या प्रेताचा ताबा घेण्यासाठी ते एकमेकांचा खून करावयास सिद्ध झाले. 
बुद्धधर्माचा भारतामधून उच्छेद करण्यासाठी भगवान बुद्धांच्या अनुयायांच्या कत्तली करण्यात आल्या." 
... हालअपेष्टा आणि छळ ह्यांचे हलाहल ज्यांना हयातीत आणि मेल्यानंतरही प्राशन करावे लागले, अशा "बंडखोर गुरूंचे" आंबेडकर हे सच्चे चेले होते."

"जुलूम आणि अन्याय म्हटला की, आंबेडकरांच्या तळपायाची आग मस्तकाला जाई. धमन्या धमन्यांमधून त्यांचे रक्त उसळ्या मारू लागे. म्हणूनच लोकसभेत पंडित नेहरूंनी बोलून दाखविल्या प्रमाणे हिंदू समाजाच्या प्रत्येक जुलुमा विरुद्ध पुकारलेल्या बंडाचे ते प्रतीक बनले."

"हिंदू समाजाने आणि सत्ताधारी काँग्रेसने आंबेडकरांची जेवढी निंदा केली, जेवढा छळ केला, जेवढा अपमान केला, तेवढा कोणाचाही केला नसेल. पण त्या छळाची आणि विटंबनेची त्यांनी लवमात्र पर्वा केली नाही. धर्माच्या आणि सत्तेच्या जुलुमाला ते कधीही शरण गेले नाहीत. शरणागती हा शब्दच मुळी आंबेडकरांच्या शब्दकोशात नव्हता. मोडेन, मार खाईन, मरेन, पण वाकणार नाही, अशी त्यांची जिद्द होती आणि त्यांनी ती शेवटपर्यंत खरी करून दाखवली."

"जो तुमचा धर्म मला कुत्र्या-मांजरा पेक्षाही हीन रीतीने वागवतो, त्या धर्मात मी कधीही राहणार नाही, असे कोट्यवधी हिंदुधर्मीयांना कित्येक वर्षांपासून ते बजावत होते. माणसासारख्या माणसांना 'अस्पृश्य' मानणारी ती तुमची 'मनुस्मृती' मी जाळून टाकणार, असे त्यांनी या सनातनी हिंदूंना छातीवर हात मारून सांगितले होते. ह्यामुळे हिंदुधर्मीय लोक त्यांच्यावर फारच संतापले. त्यांना वाटले आंबेडकर हे गझनीच्या महंमदापेक्षांही हिंदुधर्माचे भयंकर दुष्मन आहेत." 

"धर्मातराची घोषणा केल्यानंतर आंबेडकरांचा खून करण्याची योजना घेऊन एक हिंदू पुढारी डॉ. कुर्तकोटी ह्यांच्याकडे गेले होते. तेव्हा डॉ. कुर्तकोटींनी त्यांना सांगितले की, आंबेडकरांना तुम्ही मारलेत तर त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामधून दहा आंबेडकर बाहेर पडतील.!"

"आंबेडकरांची धर्मांतरांची घोषणा ही हिंदू धर्माच्या नाशाची घोषणा नव्हती. ते हिंदू धर्माच्या सुधारणेचे आव्हान होते. चातुर्वर्ण्याने हिंदू धर्माचा आणि हिंदुस्थानाचा नाश झाला आहे, असे आंबेडकरांचे मत होते. म्हणून चातुर्वर्ण्याची चौकट मोडून हिंदू समाजाची रचना समतेच्या आणि लोकशाहीच्या पायावर करा, असे टाहो फोडून ते सांगत होते."

"धर्मातराच्या प्रश्नावर आमच्याशी बोलताना एकदा ते म्हणाले की, 'हिंदू धर्मावर' मला सूड घ्यायचा असता तर पाच वर्षाच्या आत मी ह्या देशाचे वाटोळे करून टाकले असते. पण ह्या देशाच्या इतिहासात विध्वंसक म्हणून माझे नाव नोंदले जावे, अशी माझी इच्छा नाही ..! "

"हिंदू धर्माप्रमाणेच महात्मा गांधी आणि काँग्रेस ह्यांच्यावर आंबेडकर हे नेहमी प्रखर टीका करीत. त्यामुळे जनाब जीनांप्रमाणेच साम्राज्यवाद्यांशी संगनमत करून हिंदी स्वातंत्र्याचा मार्ग ते रोखून धरीत आहेत, अशीच पुष्कळ राष्ट्रवादी लोकांची समजूत झाली."

"अस्पृश्यता निवारणाकडे बघण्याचा काँग्रेसचा दृष्टिकोन हा निव्वळ भूतद्यावादी आणि भावना प्रधान होता. आंबेडकर त्या प्रश्नाकडे केवळ न्यायाच्या आणि हक्काच्या दृष्टीने पाहत असत. पारतंत्र्य नष्ट करण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध गांधीजींनी जसे बंड पुकारले, तसे अस्पृश्यता नेस्तनाबूत करण्यासाठी त्यांनी स्पृश्य समाजाविरुद्ध का बंड पुकारू नये, असा आंबेडकरांचा त्यांना सवाल होता. अस्पृश्यता निवारणाबाबत गांधीजी आणि आंबेडकर हयांच्यात अशा तऱ्हेने मतभेद होता. म्हणून साम्राज्यशाही विरोधी पातळीवर काँग्रेसची आणि आंबेडकरांची एकजूट होऊ शकली नाही."

तथापि, गांधीजींबद्दल मनात विरोधाची एवढी भावना असतानाही केवळ त्यांचे प्राण वाचवण्यासाठी म्हणून "अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघा"ची आपली मागणी त्यांनी मागे घेतली आणि 'पुणे करारा'वर सही केली."

"... 'गोडशासारख्या एका ब्राह्मणाने गांधीजींचा प्राण घ्यावा' 'आंबेडकरांसारख्या एका महाराने गांधीजींचा प्राण वाचवावा' ह्याचा अर्थ हिंदू समाजाला अद्याप समजू नये याचे आम्हाला दु:ख होते."

'पुणे करारा'वर आंबेडकरांनी सही करून गांधीजींचे प्राण वाचविले, पण स्वत:चे आणि अस्पृश्य समाजाचे फार मोठे नुकसान करून घेतले. कारण, ज्या उमद्या दिलाने आणि खेळाडू भावनेने आंबेडकरांनी 'पुणे करारा' वर सही केली, तो उमदेपणा आणि तो खेळाडूपणा काँग्रेसने मात्र आंबेडकरांना दाखविला नाही. आपल्याला धार्जिण्या असलेल्या महारेतर अस्पृश्यांना हाताशी धरून काँग्रेसने आंबेडकरांचा आणि त्यांच्या अनुयायांचा सार्वत्रिक निवडणुकीत पराभव केला आणि देशाच्या राजनैतिक जीवनातून त्यांना उठवून लावले."

"आंबेडकर त्याबद्दल नेहमी विषादाने म्हणत की, स्पृश्य हिंदूंच्या बहुमताच्या आधारावर माझे आणि माझ्या पक्षाचे राजकीय जीवन गांधीजी आणि काँग्रेस ह्यांनी ह्या देशामधून नेस्तनाबूत करून टाकले!"

"नऊ कोटी मुसलमानांना खूष करण्यासाठी काँग्रेसने ह्या सुवर्णभूमीचे तीन तुकडे करून टाकले. पण सहा कोटी अस्पृश्यांचे प्रेम मिळवण्यासाठी कागदी कायदे करण्यापलीकडे काँग्रेसने काहीही केले नाही. असे असता देशाला स्वातंत्र्य मिळताच 'घटना समितीत' अखंड हिंदुस्थानची आणि जातीय ऐक्याची प्रचंड गर्जना करून आंबेडकरांनी आपल्या विरोधकांना चकित करून टाकले. आंबेडकर म्हणाले, 'जगातील कोणतीही सत्ता ह्या देशातील ऐक्याचा भंग करू शकणार नाही आणि अखंड हिंदुस्थानातच आपले कल्याण आहे, असे आज ना उद्या मुसलमानांना कळून आल्यावाचून राहणार नाही!' आंबेडकरांचे हे उदारपण हा त्यांच्या देदीप्यमान देशभक्तीचा ज्वलंत पुरावा होय."

काँग्रेसशी पूर्वीचे असलेले सर्व वैर विसरून आंबेडकरांनी सहकार्यासाठी नेहरूंच्या हातात हात दिला आणि स्वतंत्र भारताची घटना तयार करण्याची सर्व जबाबदारी त्यांनी पत्करली.

'मनुस्मृती जाळा' म्हणून सांगणारे आंबेडकर 'भारतीय स्वातंत्र्याचे पहिले स्मृतिकार' व्हावेत हा काय योगायोग आहे? 
"घटना मंजूर झाल्यानंतर त्यांनी 'हिंदू कोडबिल' तयार करण्याचे महान कार्य हाती घेतले. पण काँग्रेस मधल्या सर्व प्रतिगामी आणि सनातनी शक्ती आंबेडकरांना विरोध करण्यासाठी एकदम उफाळून बाहेर आल्या. आणि त्यामुळे आपल्या जागेचा राजीनामा देऊन मंत्रिमंडळामधून बाहेर पडल्यावाचून आंबेडकरांना गत्यंतरच उरले नाही."

"आंबेडकरांचे 'हिंदू कोडबिल' जर मान्य झाले असते तर हिंदू समाजातील सर्व भेद, अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदू समाज हा अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता आणि भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कोणी घडवून आणली नाही ती घडून आली असती."

"पण, दुर्दैव भारताचे ..! दुर्भाग्य हिंदू समाजाचे ..! देवासारखा आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला आणि स्वत:चा घात करून घेतला. राज्यकर्त्यांनी बहिष्कारले, हिंदू समाजाने लाथाडले, तेव्हा अखेर स्वत:चा आणि आपल्या सात कोटी असहाय नि हीन-दीन अनुयायांचा उद्धार करण्यासाठी त्यांना मानवजातीला 'समतेचा, दयेचा आणि शांतीचा' संदेश देणाऱ्या त्या 'परम कारुणिक बुद्धाला' शरण जाण्यावाचून गत्यंतरच उरले नाही.

"आंबेडकरांच्या विव्दत्तेबद्दल तर त्यांच्या शत्रूला देखील कधी संशय वाटला नाही. त्यांच्याएवढा प्रचंड बुद्धीचा, विव्दत्तेचा आणि व्यासंगाचा एकही माणूस महाराष्ट्रात – नव्हे भारतात या क्षणी नव्हता.  ज्ञानोपासनेची महान परंपरा पुढे चालविणारा महर्षी आज आंबेडकरांवाचून भारतात दुसरा कोण होता? वाचन, चिंतन आणि लेखन ह्यावचून आंबेडकरांना दुसरे जीवनच नव्हत."

"महार जातीत जन्माला आलेला हा माणूस विद्येच्या आणि ज्ञानाच्या बळावर एखाद्या प्राचीन ऋषीपेक्षांही श्रेष्ठ पदाला जाऊन पोहोचला होता. धर्मशास्त्रापासून तो घटनाशास्त्रापर्यंत असा कोणताही एक कठीण विषय नव्हता, की ज्यामध्ये त्यांची बुद्धी एखाद्या गरुडासारखी वाटेल त्या उंचीपर्यंत विहार करू शकत नव्हती. तथापि, आंबेडकरांची धर्मावर आत्यंतिक निष्ठा होती ही गोष्ट फार थोड्या लोकांना माहीत होती. आंबेडकर कितीही तर्क-कर्कश आणि बुद्धिवादी असले तरी त्यांचा पिंड हा धर्मनिष्ठाचा होता. भाविक आणि श्रद्धाळू पित्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला होता. शुचिर्भूत धार्मिक वातावरणात त्यांचे सारे बालपण गेले होते. सर्व धर्माचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला होता. आत्म्याच्या उन्नतीसाठी धर्माची आवश्यकता आहे, असे त्यांचे ठाम मत होते. धर्मावरील त्यांच्या गाढ श्रद्धेमुळेच त्यांचे नैतिक चारित्र्य निरपवाद राहिले."

"त्यांना कोणतेही आणि कसलेही व्यसन नव्हते. त्यामुळेच त्यांच्या अंगात विलक्षण निर्भयता आणि आत्मविश्वास निर्माण झाला होता. आपण जे बोलतो किंवा लिहितो ते खोटे आहे, असे म्हणण्याची प्रत्यक्ष परमेश्र्वराची देखील प्राज्ञा नाही, असा आवेश आणि आत्मबल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सदैव संचारलेले असे."

"अनेक वर्षाच्या आध्यात्मिक चिंतनाने आणि परिशीलनाने शेवटी आंबेडकर 'भगवान बुद्धा' च्या चरणापाशी येऊन पोहोचले होते. बुद्धाला शरण गेल्यावाचून केवळ अस्पृश्यांनाच नव्हे, तर साऱ्या भारताला तरणोपाय नाही, असा आंबेडकरांचा ठाम निश्चय झाला होता. म्हणूनच ता. १४ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे तीन लाख अस्पृश्यांना त्यांनी बुद्ध धर्माची जेव्हा दीक्षा दिली, तेव्हा 'साऱ्या भारताला मी बौद्ध करीन' अशी गगनभेदी सिंहगर्जना त्यांना केली."

"मुंबईतील दहा लाख अस्पृश्यांना थोड्याच दिवसांनी ते बुद्ध धर्माची दीक्षा देणार होते. पण दृष्टांत काही निराळेच होते. अन्यायाशी आणि जुलुमाशी संबध जगभर झगडून झगडून त्यांचे शरीर जर्जर झाले होते, दुर्बल झाले होते. विश्रांतीसाठी त्यांच्या शरीरातील कणन् कण आसुसला होता. भगवान बुद्धाच्या करुणेचा जेव्हा त्यांना अखेर आसरा मिळाला, तेव्हा त्यांना अंत:करणात जळणारा वन्ही शीत झाला. आपल्या कोट्यवधी अनुयायांना आता आपण उद्धाराचा मार्ग दाखवून ठेवला आहे, आता आपले अवतारकार्य संपले, अशी त्यांना जाणीव झाली आणि निद्रामाऊलीच्या मांडीवर डोके ठेवून अत्यंत शांत आणि तृप्त मनाने त्यांनी आपली प्राणज्योती निर्वाणात कधी विलीन करून टाकली, त्याची जगाला दुसरे दिवशी सकाळी ते जागे होईपर्यंत गंधवार्तासुद्धा लागली नाही."

'मी हिंदू धर्मात जन्माला आलो त्याला माझा नाईलाज आहे; पण मी हिंदू धर्मात कदापि मरणार नाही!' ही आंबेडकरांची घोषणा हिंदू धर्माविरुद्ध रागाची नव्हती. सुडाची नव्हती. झगडा करून असहाय झालेल्या विनम्र आणि श्रद्धाळू साधकाचे ते तळमळीचे उद्धार होते. 

"आंबेडकरांचे चरित्र ही एका शूर आणि बंडखोर समाजसुधारकाची वीरकथा आहे. शोककथा आहे. गरिबांनी, दीनांनी आणि दलितांनी ही रोमहर्षक कथा वाचून स्फूर्ती घ्यावी. आणि आंबेडकरांचा ज्यांनी जन्मभर छळ आणि उपहास केला त्या प्रतिगामी राज्यकर्त्यांनी आणि सनातनी हिंदूंनी त्यांची ही शोककथा वाचून आता अवनतमस्तक व्हावे. आंबेडकरांच्या जीवनावर आणि कार्यावर जसजसा अधिक प्रकाश पडेल, तसतसे अलौकिकत्व प्रकट होईल. आणि आंबेडकर हे हिंदू समाजाचे शत्रू नसून उद्धारकर्तेच होते, अशी भारताची खात्री पटेल. भारतीय जीवनात जे जे म्हणून काही उज्ज्वल आणि उदात्त आहे त्यांचे आंबेडकर हे एक ज्वलंत भांडार होते. आंबेडकर हा स्वाभिमानाचा एक जळता ज्वालामुखी होता. भारताच्या ऐक्याचे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे ते महान प्रणेते होते."

"महाराष्ट्र आणि मुंबई ह्यांचे नाते जे देवाने जोडले आहे ते कोणाच्या बापालाही तोडता येणार नाही, असे ते म्हणत. कोणकोणते गुण आता आठवायचे आणि त्यांच्या कोणकोणत्या उद्धारांचे स्मरण करावयाचे? सात कोटी अस्पृश्यांच्या डोक्यावरचे तर आता आभाळच फाटले आहे. भगवान बुद्धांखेरीज त्यांचे समाधान कोण करू शकणार? आणि त्यांच्या डोळ्यातंले अश्रू तरी कोण पुसणार? त्यांनी ध्यानात धरावे की, भारताच्या इतिहासात आंबेडकर नि त्यांचे कार्य अमर आहे."

"त्यांनी जो मार्ग आखला आणि जो प्रकाश दाखवला त्याच्याच अनुरोधाने जाऊन त्यांच्या कोट्यवधी अनुयायांनी आपला उद्धार करून घ्यावा. आंबेडकरांच्या प्रत्येक अनुयायाचे हृदय हे त्यांचे जिवंत स्मारक आहे. म्हणून आंबेडकरांची विव्दत्ता, त्यांचा त्याग, त्यांचे चारित्र्य आणि त्यांची निर्भयता प्रत्येकाने आपल्या जीवनात निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला तरच आंबेडकरांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण होईल आणि साऱ्या भारताचा उद्धार होईल. तीन कोटी मराठी जनतेच्या वतीने व्याकूळ हृदयाने आणि अश्रूपूर्ण नेत्रांनी आम्ही आंबेडकरांच्या पार्थिव देहाला अखेरचे अभिवादन करतो."

आचार्य अत्रे / (मराठा : 7-12-1956)

सोमवार, २५ नोव्हेंबर, २०१९

चक्क राज्यपालांना मारली होती थप्पड...

ही घटना १९८२ ची आहे.. देवीलाल यांनी तेव्हा राज्यपाल महोदयांच्या कानफडात मारली होती.. ९० सदस्य संख्या असलेल्या हरयाणा विधानसभेत काँग्रेसचे सर्वाधिक ३५ आमदार निवडून आले होते. लोकदलाचे ३१ आणि  भाजपचे ६ आमदार निवडून आले. बाकी इतर अपक्ष वगैरे. भाजपने पहिल्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसला रोखण्यासाठी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या देवीलाल यांच्या  लोकदल पक्षास पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. पण राज्यपालांनी बहुमताची शहानिशा न करता काँग्रेसच्या भजनलाल यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.  ( आज काँग्रेस तेच करतेय, पण ते पाप आहे असे भक्तमंडळी म्हणतात) अपक्ष व इतर आमदारांसह देवीलाल यांनी बहुमताचा आकडा गाठून सरकार स्थापनेचा दावा केला पण 'काँग्रेसी' राज्यपालांनी त्यांचे ऐकले नाही... म्हणजे आज महाराष्ट्रात भाजपच्या राज्यपालांनी जशी परिस्थिती निर्माण केली आहे, साधारण तशीच. भाजपचे ६  लोकदलाचे ३१ आणि अपक्ष अशा बहूमताच्या ४६ हून अधिक सदस्यांसह देवीलाल यांनी राज भवन गाठले. राज्यपाल जी.डी. तापसे यांच्यासमोर पाठिंबा देणाऱ्या बहुमताच्या आकड्यासह आमदारांची परेड घडवली. बहूमत तुमच्या डोळ्यांनी बघा आणि काँग्रेसचे भजनलाल सरकार बरखास्त करा अशी विनंती देवीलाल यांनी राज्यपाल महोदयांना केली. पण राज्यपाल जी डी तापसे मान्य करायला तयार नव्हते. अखेर संयम संपला आणि संतापलेल्या देवीलाल यांनी राज्यपालांची गचांडी धरली. कॉलर सोडवण्यासाठी राज्यपालांनी हिसका मारला तसा देवीलाल यांनी सरळ राज्यपाल तापसे यांच्या थोबाडीत एक सणसणीत थप्पड ठेऊन दिली. लोकशाहीची हत्या करणाऱ्या राज्यपालांना कसा धडा शिकवायचा याचा राजमार्ग भाजप आमदारांच्या साक्षीने देवीलाल यांनी दाखवून दिला.  महाराष्ट्रातही आज तेच घडते आहे. शिवसैनिक, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संयम सोडावा आणि देवीलाल यांच्यासारखे पाऊल उचलावे, असे लोकशाहीच्या मारेकऱ्यांना वाटते काय..?  
*- टी. गणेशन्*
(सदर माहिती व्हाट्सआप समूहावरून)

रविवार, १० नोव्हेंबर, २०१९

व्यंगचित्रकारांना दिसलेले डॉ. आंबेडकर...


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर १९३२ सालापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत- म्हणजे १९५६ सालापर्यंत भारतातील इंग्रजी वृत्तपत्रांतून प्रकाशित झालेल्या व्यंगचित्रांचे विश्लेषणात्मक संकलन म्हणजे 'नो लाफिंग मॅटर : द आंबेडकर कार्टून्स १९३२-१९५६’ हे पुस्तक! त्याचे संपादन उन्नमती सुंदर यांनी केले असून ते सध्या जेएनयूमध्ये पीएच.डी.चा अभ्यास करत आहेत.

२०१२ साली शालेय पुस्तकात असलेल्या बाबासाहेबांवरील व्यंगचित्रावरून गदारोळ उडाला होता. या व्यंगचित्रामुळे बाबासाहेबांची बदनामी होते, असे आरोप झाले. हे व्यंगचित्र के. शंकर पिल्ले यांनी काढले होते. या व्यंगचित्राबद्दल मे २०१२ मध्ये संसदेत चर्चा झाली होती. याबद्दल अहवाल देण्यासाठी मनमोहन सिंग सरकारने प्रा. सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली. थोरात समितीच्या अहवालानुसार ते वादग्रस्त व्यंगचित्र काढण्याचा निर्णय घेतला गेला. तेव्हा काही अभ्यासकांनी आविष्कारस्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला होता. आज अशी स्थिती आहे की, ते व्यंगचित्र पुस्तकात नाही.

मायाजालावरून साभार...
हा वाद चर्चेत होता, तेव्हा उन्नमती सुंदरला वाटले, की एका व्यंगचित्रावरून एवढा वाद होतो तर अशी किती व्यंगचित्रे आहेत- ज्यात बाबासाहेब आहेत? या शोधाचे फळ म्हणजे प्रस्तुत पुस्तक. यासाठी सुंदरला सुमारे चार वर्षे अभ्यास करावा लागला. ठिकठिकाणच्या इंग्रजी वृत्तपत्रांच्या कार्यालयात जाऊन जुने अंक बघावे लागले. हे पुस्तक फार वेगळे आहे. अशी पुस्तके महात्मा गांधी, पंडित नेहरू, वगैरे नेत्यांबद्दल उपलब्ध आहेत. बाबासाहेबांवर हे एकमेव पुस्तक आहे.

मायाजालावरून साभार...
सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार वसंत सरवटे ‘व्यंगचित्र’ या शब्दाला ‘हास्यचित्र’ असा पर्यायी शब्द सुचवत असत. सरवटेंचे विवेचन फक्त हास्य निर्माण करणाऱ्या चित्रांपुरते योग्य जरी असले, तरी राजकीय व्यंगचित्रांबद्दल तसे म्हणता येत नाही. राजकीय व्यंगचित्रांत व्यंगचित्रकाराने एक भूमिका घेतलेली असते. त्यातून त्या व्यंगचित्रकाराची राजकीय समज व्यक्त होते. म्हणूनच व्यंगचित्रकार कोणाची टिंगल करतो, कशी करतो वगैरे मुद्दे आपसूकच महत्त्वाचे ठरतात.

काही महिन्यांपूर्वी प्रकाशित झालेले ‘नो लाफिंग मॅटर : द आंबेडकर कार्टून्स १९३२-१९५६’ हे पुस्तक. या पुस्तकात सुमारे १२२ व्यंगचित्रे आहेत. त्यांनी प्रत्येक व्यंगचित्राला विस्तृत संपादकीय टिपण दिले आहे. त्यांची व्यंगचित्रे roundtableindia.co.in या संकेतस्थळावर नेहमी प्रकाशित होत असतात.
‘नो लाफिंग मॅटर’ला तरुण दलित अभ्यासक सूरज येंगडे यांची प्रस्तावना आहे. यात येंगडे एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात. त्यांच्या मते, हे पुस्तक म्हणजे बाबासाहेबांचे राजकीय चरित्र होऊ शकते; फक्त येथे चरित्रकार कुंपणाच्या पलीकडे उभे आहेत. हे निरीक्षण खरे आहे. याचे कारण या पुस्तकात ज्यांची व्यंगचित्रे बघायला मिळतात, ती सर्व कलाकार मंडळी सवर्ण आहेत. मात्र हे मान्य करताना ज्या काळातील ही चित्रे आहेत, त्या काळाकडे लक्ष दिले पाहिजे. ही व्यंगचित्रे १९३२ ते १९५६ या काळातील आहेत, जेव्हा सवर्ण समाजाने पुरेशा प्रमाणात पुरोगामी मूल्ये पचवली नव्हती. आज अशी व्यंगचित्रे काढणे त्यामानाने बरेच अवघड आहे. याचा अर्थ दलित-सवर्ण यांच्यातील दरी पूर्णपणे बुजली असा अर्थातच नाही. पण तेव्हाचा विखार आज नाही, हे मान्य व्हायला हरकत नसावी. दुसरे म्हणजे, बाबासाहेबांनी अनेकदा गांधीजींच्या, काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेतल्या होत्या, त्यांच्यावर जबरदस्त टीका केली होती. परिणामी सवर्णाच्या मनांत बाबासाहेबांबद्दल किंतू होते, हे नाकारता येत नाही.

मायाजालावरून साभार...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९१७ साली भारतात परतले आणि १९२४ साली मुंबईत ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ स्थापन केली. येथून त्यांचे सार्वजनिक जीवन सुरू होते. पण देशातील इंग्रजी वृत्तपत्रांनी बाबासाहेबांची दखल १९३० ते १९३२ च्या दरम्यान इंग्लंडमध्ये भरलेल्या गोलमेज परिषदांनंतरच घ्यायला सुरुवात केली. याचे साधे कारण म्हणजे गोलमेज परिषदांत बाबासाहेबांनी अनेक वेळा गांधीजींना जबरदस्त विरोध केला होता. महात्मा गांधींसारख्या नेत्याला विरोध करणारा हा कोण, म्हणत इंग्रजी वृत्तपत्रांनी बाबासाहेबांची तेव्हापासून दखल घ्यायला सुरुवात केली, ती त्यांचा डिसेंबर १९५६ मध्ये मृत्यू होईपर्यंत.

संपादक सुंदरने या पुस्तकाची रचना कालानुक्रमे केली आहे. यातील पहिले व्यंगचित्र ३० जुलै १९३२ रोजी ‘हिंदुस्तान टाइम्स’मध्ये प्रकाशित झालेले आहे, तर शेवटचे व्यंगचित्र २५ सप्टेंबर १९५६ रोजी ‘नॅशनल हेराल्ड’मध्ये प्रकाशित झालेले आहे.
थोडक्यात, बाबासाहेबांच्या जीवनातील महत्त्वाची वर्षे व्यंगचित्रांच्या माध्यमातून पकडली आहेत आणि यात उच्चवर्णीय मानसिकता कशी व्यक्त झाली आहे, हे जवळपास प्रत्येक पानातून सांगितले आहे. अर्थात, प्रत्येक व्यंगचित्राबद्दल संपादकाचे हे मत ग्रा धरता येणार नसले, तरी एकुणात व्यंगचित्रांतून बाबासाहेबांकडे तेव्हाचा सत्ताधारी वर्ग कसा बघत होता, याचा ऊहापोह आहे. संपादकाची अशी पक्की धारणा आहे, की सर्व व्यंगचित्रकारांनी बाबासाहेबांना जाणीवपूर्वक एक छोटा, कटकटी करणारा नेता दाखवले आहे. बाबासाहेबांना कधी रडणारे मूल दाखवले आहे, कधी साडी नेसलेली स्त्री, तर कधी जमिनीवर बसलेल्या आश्रितासारखे दाखवले आहे. हे निरीक्षण बऱ्याच अंशी योग्य असले, तरी या पुस्तकातील काही व्यंगचित्रे या निरीक्षणाला छेद देणारी आहेत.

अशोक मेहतांचा समाजवादी पक्ष देशभर लोकप्रिय होता. त्या तुलनेत बाबासाहेबांचा पक्ष नव्हता. काँग्रेस पक्षाला या दोन शक्तींच्या राजकीय युतीची भीती होती. म्हणून बैलाच्या रूपातील पंडित नेहरू कुत्र्याच्या रूपातल्या बाबासाहेबांना- ‘मलाही थोडेसे खाऊ द्या’ अशी विनंती करत आहेत. यात अंतिम सत्ता समाजवादी पक्षाच्या हाती आहे, असे सूचित केले आहे. ज्या प्रकारे डॉ. मेहता आरामात पहुडले आहेत, त्यावरून त्यांना निवडणुका जिंकण्याबद्दल कमालीचा आत्मविश्वास होता हे दिसून येते.

बाबासाहेबांच्या विरोधात या प्रकारचा आकस जरी सुरुवातीला असला, तरी नंतर खास करून घटना समितीचे काम पूर्ण झाल्यावर आणि बाबासाहेबांना ‘आधुनिक मनू’ म्हणायला लागल्यानंतर यात बदल झालेला दिसतो. नंतरच्या अनेक व्यंगचित्रांत सुटाबुटातले बाबासाहेब दिसतात. हा बदल समजून घेतला पाहिजे.

(सदर माहिती खालील लिंकवरून साभार. अधिक सविस्तर माहिती या लिंकवर वाचा.)
https://www.loksatta.com/athour-mapia-news/well-known-cartoonist-vasant-sarwate-dr-b-r-ambedkar-akp-94-2011403//lite/

शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०१९

नियोजित साहित्य संमेलनाचा लोगो पाहिलात का?

उस्मानाबाद येथील
नियोजित 
साहित्य संमेलनाचा लोगो...

हे माहिती नाही ना... मग वाचा...
ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या तसेच त्यावर एकत्र येऊन विचार विनिमय करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने १८७८च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन 'ज्ञानप्रकाश' (७ फेब्रुवारी १८७८) मधे प्रसिद्ध झाले आणि या आवाहनानुसार ११ मे १८७८ रोजी सायंकाळी पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले. याला पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समजले जाते. या संमेलनाचे अध्यक्षपद न्या. रानडे यांनीच भूषविले होते.

दुसरे साहित्य संमेलन १८८५ साली पुण्यातच भरले. या संमेलनाला पहिल्याच्या मानाने चांगली म्हणजे शे-सव्वाशे नामवंत ग्रंथकारांनी उपस्थिती लावली होती. 
१८८६ ते १९०४ दरम्यान कोणतेही साहित्य संमेलन झाले नाही.

तिसरे साहित्य संमेलन १९०५ च्या मे महिन्यात सातारा येथे भरले. लो. टिळकांचे एक सहकारी साताऱ्यातले सुप्रसिद्ध वकील र. पां. ऊर्फ दादासाहेब करंदीकर हे संमेलनाचे अध्यक्ष होते. २३ मे च्या केसरीत या संमेलनाचा त्रोटक वृत्तान्त प्रसिद्ध झाला होता.

चौथे साहित्य संमेलन पुणे येथे २७-२८ मे १९०६ शनिवार, रविवार या दिवशी सदाशिव पेठेत नागनाथपाराजवळच्या मयेकर वाड्यात भरले होते. हे संमेलन आधीच्या संमेलनांपेक्षा जास्त यशस्वी व विधायक स्वरूपाचे झाले. संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी, ग्रंथकार आणि भाषांतरकार गोविंद वासुदेव कानिटकर होते. त्या वेळची अनेक मान्यवर ग्रंथकार मंडळी संमेलनासाठी एकत्र आलेली होती. निबंध वाचन, भाषणे, ठराव यामुळे संमेलन दोन दिवस गाजले.

साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांची यादी
१. इ.स. १८७८ (पुणे) न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
इ.स. १८७९ ते इ.स. १८८४ (संमेलन नाही)

२. इ.स. १८८५ (पुणे) कृष्णशास्त्री राजवाडे
इ.स. १८८६ ते इ.स. १९०४ (संमेलन नाही)

३. इ.स. १९०५ (सातारा) रघुनाथ पांडुरंग करंदीकर

४. इ.स. १९०६ (पुणे) गोविंद वासुदेव कानिटकर

(मायाजालावरून साभार)

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

१४ व्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. महेंद्र भवरे

महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ पुरस्कृत आंबेडकरी साहित्य व कला अकादमीच्या वतीने 14 वे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन 23, 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी यवतमाळ येथे करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवी, संशोधक, साहित्य आणि मुंबई विद्यापीठाच्या  मराठी विभागावात कार्यरत असलेले प्राध्यापक डॉ. महेंद्र भवरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. यापूर्वी
  • वामनदादा कर्डक
  • बाबुराव बागूल
  • डॉ. गंगाधर पानतावणे
  • राजा ढाले
  • अविनाश डोळस
  • यशवंत मनोहर
  • रावसाहेब कसबे
  • उत्तम कांबळे 
अशा दिग्गजांनी या संमेलनाचे अध्यक्षपदे भूषविली आहेत.

डॉ. भवरे यांचे मराठी साहित्यातील योगदान विशेष उल्लेखनीय आहे. 
  • 'चिंताक्रांत मुलुखाचे रुदन', 
  • 'महासत्तेचे पीडादान' 
हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. 
  • 'दलित कवितेतील नवे प्रवाह', 
  • 'मराठी कवितेच्या नव्या दिशा', 
  • 'दलित कविता आणि प्रतिमा' 
हे त्यांचे समीक्षाग्रंथ विशेष बहुचर्चित ठरले आहेत.
'प्रेमानंद गज्वी यांचा लेखनप्रवास' या ग्रंथाच्या संपादनासह यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासाठी वाङमयेतिहासाच्या आठ पुस्तकांचे संपादन डॉ. भवरे यांनी केले आहे. जागतिक मराठी भाषा गौरवदिनी (२७ फेब्रुवारी २०१९) महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने त्यांचा 'मराठी दलित कवितेचा इतिहास' हा बृहद ग्रंथ प्रकाशित केला आहे. (सदर पुस्तक फोटोझिंको, (महाराष्ट्र शासन मुद्रणालय) पुणे येथे उपलब्ध आहे.)

डॉ. भवरे यांच्या कार्याचा गौरव करणारे काही विशेष उल्लेखनीय पुरस्कारात खालील नावे पुरस्कारांची नावे उल्लेखनीय आहेत.
  • महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्कार
  • 'अनुष्टुभ प्रतिष्ठान'चा विभावरी पाटील पुरस्कार,
  • मुंबई मराठी साहित्य संघाचा समीक्षक पुरस्कार,
  • प्रभाकर पाध्ये समीक्षा पुरस्कार, 
  • विखे पाटील पुरस्कार, 
  • शरदचंद्र मुक्तिबोध पुरस्कार,
  • नामदेव ढसाळ काव्य पुरस्कार,
  • वामनदादा कर्डक जागृती पुरस्कार 
डाॅ. महेंद्र भवरे यांची संमेलनअध्यक्षपदी निवड झाल्याने मराठी साहित्य वर्तुळासह विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

9920789385

रविवार, ३ नोव्हेंबर, २०१९

कालातीत विचार 'शिल्पा'चा गौरव...

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरवगाथा' च्या पटकथाकार शिल्पा कांबळेना भीमाबाई आंबेडकर पुरस्कार जाहीर
सातारा येथील संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री महामाता भीमाबाई आंबेडकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी प्रसिद्ध साहित्यिक शिल्पा कांबळे, मुंबई यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य अण्णासाहेब होवाळे व उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे यांनी दिली .

संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने साहित्य, कला, संस्कृती व परिवर्तनाची चळवळ आदी क्षेत्रात मौलिक योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव करण्याच्या हेतूने १९९८ पासून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह, शाल असे आहे.

या वर्षीचा २२ वा पुरस्कार स्टार प्रवाह वाहिनीवरील 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरवगाथा' या सध्या गाजत असलेल्या मालिकेच्या पटकथा लेखिका, प्रसिद्ध कथाकार नाटककार शिल्पा कांबळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनापुर्वी एक डिसेंबर २०१९ रोजी नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये ज्येष्ठ साहित्यिक प्रसिद्ध कवी प्रमोद मनोहर कोपर्डे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे .

या वर्षीच्या पुरस्काराच्या मानकरी शिल्पा कांबळे या प्रसिद्ध मराठी कादंबरीकार आहेत. त्यांची 'निळ्या डोळ्यांची मुलगी' या २०१४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या बहुचर्चित कादंबरीचे सर्व थरातून मोठे स्वागत झाले आहे. 'नऊ चाळीसची लोकल' हा कथासंग्रह मुक्तशब्द प्रकाशनच्या वतीने प्रकाशित झाला आहे. मुक्तशब्द व नवअनुष्टुभ सारख्या प्रितिष्ठित मासिकातून त्यांच्या अनेक कथा प्रसिद्ध झाल्या आहेत.

'बिर्याणी' या त्यांच्या नाटकास महाराष्ट्र राज्य नाट्य पुरस्काराने गौरविण्यात आले असून पुणेच्या काफिला प्रोडक्शनच्या अँब्स्ट्रॅक्ट थिएटर व कल्याणच्या इम्पेरिकल थिएटरच्या वतीने या नाटकाचे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रयोग झाले आहेत. सन २०१७ मध्ये त्यांच्या नाट्य लेखनासाठी झी गौरव पुरस्काराचे मानांकन मिळाले आहे. सोनी मराठी वाहिनीवरील 'ती फुलराणी' या मालिकेचे संवाद लेखनही त्यांनी केले आहे.

जातीय अत्याचार, लिंगभेद व मानवी स्वातंत्र्य, महिला समस्यांवर त्यांनी मान्यवर दैनिकातून लेखन करून वाचा फोडली आहे. स्किपटीज क्रिएशन, मुंबई या लेखक फोरम बरोबर त्या काम करीत आहेत. सध्या त्या मुंबई येथे आयकर अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

पद्मश्री दया पवार पुरस्कार, कायद्यानेवागा लोक चळवळीचा सावित्री पुरस्कार, बोधी कलमंचचा अश्वघोष पुरस्कार, कणकवलीचा तांबे पुरस्कार, सुभाष भेंडे वांड्मय पुरस्कार आदी पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे.

भीमाबाई आंबेडकर पुरस्कारानेआतापर्यंत
  1. डॉ. ज्योती लांजेवार (नागपूर), 
  2. प्रा. पुष्प भावे (मुंबई), 
  3. रझिया पटेल (पुणे), 
  4. बेबीताई कांबळे (फलटण),
  5. यमुनाबाई वाईकर( वाई), 
  6. उर्मिला पवार (मुंबई), 
  7. डॉ. सिसिलिया कार्व्हालो (वसई), 
  8. प्रा. इंदिरा आठवले (नाशिक), 
  9. पद्मश्री तिस्ता सेटलवाड (मुंबई), 
  10. हिरा बनसोडे (मुंबई), 
  11. प्रतिमा जोशी (मुंबई), 
  12. उल्का महाजन (पनवेल), 
  13. प्रा. सुशीला मूल-जाधव (औरंगाबाद), 
  14. डॉ. गेल ऑम्वेट (कासेगाव), 
  15. मेधाताई पाटकर (मुंबई), 
  16. संध्या नरे-पवार (मुंबई), 
  17. मुक्ता दाभोलकर (दापोली), 
  18. मुक्ता मनोहर (पुणे) व 
  19. प्रा. आशालता कांबळे (मुंबई) 
आदीना या पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे.
   ----दिनकर झिंब्रे
(सदर माहिती व्हाट्सअप ग्रुप वरून साभार)

रविवार, २७ ऑक्टोबर, २०१९

आनंदाचे दीप उजाळू द्या सदैव तुमच्या घरी...

आनंदाचे दीप उजाळू द्या
सदैव तुमच्या घरी ।
तन-मनावर बरसत राहो, 
चैतन्याच्या सरी ।।
सुख, संपत्ती, समृद्धीला,
 नुरो कदापि उणे ।
दीपावलीच्या लाखो दिव्यांनी, 
आपले प्रकाशमय होवो जीणे ।।     
                 
जागल्या परिवाराकडून आपल्याला दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

रविवार, २० ऑक्टोबर, २०१९

मतदान करताय मग एकदा विचार कराच...

दीपक_जाधव
अवघ्या काही मिनिटात विधानसभा निवडणुकीचा प्रचार थांबेल. यंदा मत कणाला द्यायचे हे तुम्हा बहुतेकांचे ठरले ही असेल, तरीही एक विनंती करतोय. तुम्ही ज्यांना मत देण्याचे ठरवले आहे त्याचा शांतपणे पुन्हा एकदा विचार करा. 
तुम्ही ज्यांना मत द्यायला निघाला आहात ते रोजगाराच्या प्रश्नांवर बोलतायत का, आरोग्याच्या सुविधा सामन्यांच्या आवाक्यात याव्यात यासाठी त्यांची तळमळ आहे का, प्रत्येकाला हवं ते शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी त्यांच्याकडे ठोस धोरण आहे का, धार्मिक रंग देऊन तर ते मत मागत नाहीत ना, ते राज्याच्या प्रश्नांवर बोलतायत की इतर भावनिक मुद्दे मांडतायत याचा नक्की विचार करा.
मुख्य म्हणजे तुम्ही एखाद्या पक्षाला पाशवी बहुमत देऊन तुमचे हक्क, अधिकार गहाण तर टाकत नाही आहात ना. बघा विचार करा, तुमचं मत अमूल्य आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2810735635624654&id=100000647355855

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१९

आमच्या 'मराठी'च्या वाचकांना हे माहिती आहेच?

श्री. यशवंतराव चव्हाण यांनी दिनांक 1 मे, 1960 ला महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या वेळी शासनाची जी धोरणविषयक प्रमेये जाहीर केली त्यात महाराष्ट्र राज्याच्या मराठी साहित्य, कला व संस्कृती या क्षेत्रातील कार्यकर्त्याच्या कार्यांची उपेक्षा होणार नाही; एवढेच नव्हे तर त्या कार्याची प्रगती व विकास होईल ह्या दृष्टीने पावले निश्चितपणे टाकण्यात येतील; असे आश्वासन दिले होते. त्याच धोरणानुसार महाराष्ट्राचे साहित्य, इतिहास व संस्कृती यांच्या विकासासाठी दिनांक 19 नोव्हेंबर, 1960 ला शासनाने साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना पहिल्यांदा पाच वर्षाकरिता केली. त्यानंतर वेळोवेळी मंडळाची पुनर्रचना करण्यात आली. थोर विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मंडळाचे अध्यक्षपद भूषविले होते. त्यानंतर वेळोवेळी अनेक मान्यवर साहित्यिक व विचारवंतांची नियुक्ती या पदावर झाली.
मंडळाचे अध्यक्ष खालील प्रमाणे –
अध्यक्ष
कार्यकाल
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
1960 ते 1980
डॉ.सुरेंद्र बारलिंगे
1980 ते 1989
प्रा. यशवंत मनोहर
1989 ते 1990
डॉ. य.दि. फडके
1990 ते 1995
श्री. विद्याधर गोखले
1995 ते 1996
डॉ. मधुकर आष्टीकर
1996 ते 1998
श्री. द.मा. मिरासदार
1998 ते 1999
श्री. सुरेश द्वादशीवार
2000 ते 2000
प्रा. रा.रं. बोराडे
2000 ते 2004
प्रा. रतनलाल सोनग्रा
2004 ते 2004
पद्मश्री मधु मंगेश कर्णिक
2006 ते 16 ऑगस्ट 2013
मा. सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई तथा. मा. अध्यक्ष, (अतिरिक्त कार्यभार), महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
दिनांक 17/08/2013 ते 04/08/2015
श्री. बाबा भांड                      
05 ऑगस्ट, 2015 ते दिनांक 25 डिसेंबर, 2018
डॉ. सदानंद मोरे               26 डिसेंबर, 2018 पासून
(सदर माहिती नेटवरून साभार सविस्तर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१९

हवरीसाठी मी हवरा, तू लाजलेली नवरी गं.. पडलं पडलं आभाळ, मी भेदरलेला ससा गं.

@सुमीत_गुणवंत हे नव्या फळीतल्या तरुण कवींपैकी एक नाव.
छत्रपती शाहू प्रतिष्ठान गोवा यांच्या
संयुक्त विद्यमाने नोव्हेंबर 2019 मध्ये गोवा येथे होणाऱ्या 'अंतरराज्यीय फुले शाहू आंबेडकर विचार प्रसार साहित्य
संमेलना'च्या मुख्य कविसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून नुकतीच सुमीत गुणवंत याची निवड झाली. 
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि  ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे. या संमेलनाला गोव्याचे मुख्यमंत्री आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गोव्याच्या छत्रपती शाहू प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.अनिल इब्रामपूरकर, संस्थापक परेश परमार आणि 'फुले शाहू आंबेडकर विचार प्रसार' संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रोहिदास जाधव, डॉ. राजाभाऊ भैलुमे, डॉ. अरुण बुरांडे यांनी सुमीतच्या निवडीबद्दल अभिनंदन केले.
सभोवतालचे सामाजिक वास्तव हा सुमीतच्या कवितेचा गाभा आहे.
सुमीत बरोबरच सागर काकडे याही नव्या दमाच्या कवीने 'तुमच्याही गोळीवर माझं नाव लिहा' म्हणत सामाजिक प्रबोधनाची सशक्त बाजू आपल्या कवितेतून मांडली आहे. सुमीत आणि सागर ही जोडगोळी शिवराय, तुकोबा, फुले, शाहू, आंबेडकरी विचारांची व स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची कविता नव्या पिढीला देतील हा विश्वास आहे. 
सुमीत एक कवितेत म्हणतोय,

"न्यायाच्या वाटेवर,
न्यायाची वाट पाहणाऱ्यावर
होणारा अन्याय...
जर जागतिकीकरणाचे डोळे लावलेल्या
देशाला दिसत नसेल..
तर ही महासत्ता नाही
ही डिजिटल मेकअप केलेल्या
देशाच्या आत्म्याची हत्या आहे.."

दुसऱ्या एका कवितेत सुमीत म्हणतो,

नऊ दिवस रंग उधळणार देवीला,
आणि खैरलांजीचा निषेध फक्त चवीला...?
म्हणून कितीही नाही म्हटलं
तरी कंबरे खालची भाषा 
वापरावीच लागते
माझ्यासारख्या कवीला...

पुढच्या कवितेत सुमीत म्हणतो,

गावगाड्यावर बोलण्यापेक्षा
बोलायला पाहिजे होतं जातवाड्यावर...!!
आणि शनिवारवाड्याच्या पायरीपेक्षा
बसायला पाहिजे होतं फुले वाड्याच्या पायरीवर ....!

सुमीतच्या सामाजिक कविता जितक्या ताकदीच्या आहेत तितक्याच प्रेम कविताही शसक्त आहेत.
सामाजिक कवितेबरोबरच सुमीतच्या #ससा या 'प्रेम कवितेने' रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला आहे. 
या कवितेत कवी म्हणतो...

प्रेमाच्या सागरातला मी,
प्यासा मासा गं...
पडलं पडलं आभाळ,
मी भेदरलेला ससा गं...

...नेमक्या जागी नेमका तीळ,
भाजलेली हवरी गं..
हवरीसाठी मी हवरा,
तू लाजलेली नवरी गं..
माझा माझ्याव नाही राहिला भरवसा गं..
पडलं पडलं आभाळ मी भेदरलेल्या ससा गं..

सुमीतची 'ससा' ही प्रेम कविता यू ट्यूबवर  ऐकण्यासाठी #ससा या शब्दावर क्लिक करा.
-------------------------------
   सुमित गुणवंत
95 03 06 05 48

मंगळवार, १ ऑक्टोबर, २०१९

सोशल मीडियावर झिंगाट प्रचार

भारतातील सोशल मीडिया व्यासपीठांच्या विस्ताराचा राजकारणाशी संबंध जोडताना २०१४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वीचे राजकारण आणि त्यानंतरचे राजकारण असे दोन महत्त्वाचे टप्पे विचारात घेतले जातात. भारतात फेसबुक, यू-ट्युब आणि ट्विटरचा वापर वाढण्याचा काळ हा २००९ च्या लोकसभा निवडणुकांनंतच्या काळामध्ये मोडतो.
  • २००९ च्या निवडणुकानंतरच्या काळात भारतातील सोशल मीडिया वापरणाऱ्यांच्या प्रमाणामध्ये सातत्याने वाढ झाल्याचे अनुभवायला मिळत आहे. 
  • २०१४ च्या निवडणुकीपूर्वी त्यामध्ये झालेली वाढ ही या निवडणुकांसाठी एक निर्णायक घटक ठरली होती. 
  • सोशल मीडियाचा राजकारणासाठी वापर करून घेण्याची पूर्वतयारी म्हणूनच २०१४ च्या निवडणुकांपूर्वीचा काळ विचारात घेतला गेला. 

  • राजकीय पक्षांनी आपल्या पक्षासाठी आणि पक्षाच्या विविध उमेदवारांसाठी म्हणून सोशल मीडियाच्या व्यासपीठांवरून राजकीय संदेशांचे प्रसारण करू शकणारे छोटे- छोटे गट नेमले होते. 
  • पक्षाच्या वा उमेदवाराच्या प्रचारासाठीचे संदेश तयार करणे, सोशल मीडिया व्यासपीठांवरून ते संदेश मोठ्या प्रमाणावर प्रसारित करणे, नवनवीन मतदारांपर्यंत थेट पोहोचणे, त्यांना विशिष्ट विचारांनी प्रभावित करत अंतिमतः त्याला आपला मतदार बनविणे अशा टप्प्यांमधून या निवडणुकांसाठीची तयारी पूर्ण करण्यात आली होती.
  •  
  • या पूर्वतयारीचे थेट परिणाम २०१४ च्या निवडणुकांमधून राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर थेट अनुभवायला मिळाले. 

  • सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या व्यासपीठांवर प्रभावीपणे प्रचार- प्रसार करणारे नेते आणि पक्ष या निवडणुकीमध्ये विजयी झाले.

  • माध्यमाधारित राजकारणामध्ये, २०१४ पूर्वीच्या काळात पारंपरिक प्रसारमाध्यमांना राजकारण्यांकडून महत्त्व दिले जात असे. मात्र, सोशल मीडियाच्या वाढत्या विस्ताराने हे चित्र काहीसे बदलायला सुरुवात केली.

  • प्रसारमाध्यमांच्या भारतातील विस्ताराच्या इतिहासाच्या टप्प्यांमध्ये स्वातंत्र्यपूर्वकालीन माध्यमे- स्वातंत्र्योत्तर माध्यमे, ‘खा-उ-जा’ धोरणापूर्वीची माध्यमे- ‘खा-उ-जा’ धोरणानंतरची माध्यमे, इंटरनेटपूर्वीची माध्यमे- इंटरनेटनंतरची माध्यमे, मोबाईलपूर्वीची माध्यमे- मोबाईलनंतरची माध्यमे, सोशल मीडियाच्या आगमनापूर्वीची माध्यमे आणि सोशल मीडियाच्या आगमनानंतरची माध्यमे असे ढोबळ वर्गीकरण करता येते.
  • अगदी त्याच संदर्भाने आपल्याला अशी माध्यमे वापरू शकणाऱ्यांच्या माध्यमांविषयीच्या जाणीवा, माध्यमांमधून समोर मांडल्या जाणाऱ्या आशयाविषयी विचार करण्याची क्षमता, माध्यमांसाठी स्वतः आशय तयार करण्याची प्रेरणा आणि त्यासाठीच्या क्षमता आदी बाबींचाही आढावा घेणे गरजेचे ठरते. 
  • देशात खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार झाल्यानंतरच्या काळात माध्यमांची मालकी अधिक व्यापक बनली. व्यवसाय हा महत्त्वाचा भाग बनला.
  • व्यवसायवृद्धीसाठीची राजकीय भूमिका ही अगदी सहजपणेच घेतली जाऊ लागली. 
  • सोशल मीडियाच्या आगमनाने तर राजकीय प्रचाराला अभूतपूर्व वेग मिळाला. त्या पूर्वीच्या काळात हा प्रचंड वेग कधीही नव्हता.
  • राजकीय प्रक्रियेला माध्यमांकडून मिळणारी दिशा ही संथपणाची होती. मात्र तत्त्कालिन समाजजीवनाचा एकूण वेग विचारात घेतला, तर हा संथपणाही अपेक्षित राजकीय परिणाम घडवून आणू शकत होता. 
  • सोशल मीडियाच्या भारतामधील विस्तारापूर्वीच्या काळात वेगवान राजकीय बदल घडवून आणण्याच्या माध्यमांच्या क्षमतेला तशा मर्यादाच होत्या. 
  • या कालखंडाचा वेगळ्या संदर्भाने विचार केला, तर हा कालखंड होता, स्वातंत्र्यानंतरच्या साधारण ६०- ६५ वर्षांचा. 
  • त्या नंतरच्या टप्प्यावर खरं तर २०१४ ची लोकसभा निवडणूक झाली. नुकतीच झालेली गुजरातमधील बहुचर्चित निवडणुकही याच टप्प्यावर झाली.
  • या टप्प्यावरचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आता सोशल मीडियाची व्यासपीठे ही पारंपरिक माध्यमांइतकीच मुख्य प्रवाहातील माध्यमे म्हणून  प्रस्थापित झाली आहेत. 
  • भारतामध्ये सोशल मीडिया व्यासपीठांचे सार्वत्रिकीकरण होण्यापूर्वीच्या काळामध्ये पारंपरिक माध्यमांमधून आपल्या प्रतिमानिर्मितीसाठी म्हणा वा प्रचार-प्रसारासाठी म्हणा, राजकारण्यांना केवळ माध्यमकर्मींवरच अवलंबून राहावे लागत होते. त्याकामी कार्यकर्ते तसे फारसे उपयोगी ठरत नव्हते.
  • आता डिजिटल कार्यकर्त्यांच्या फळ्याच तयार झाल्या आहेत, अगदी प्रोफेशनल! 
  • या फळीतील कार्यकर्ते हे समाजमाध्यमे वा नवमाध्यमे वापरून घेण्यात पटाईत असतात. 
  • या फळ्या केवळ आपल्या नेत्याची प्रतिमानिर्मितीच करत नाहीत, तर विरोधी नेत्याची-पक्षाची प्रतिमाहनन करण्याची जबाबदारीही पार पाडत आहेत. 
  • माध्यमांसाठी महत्त्वाचा असणारा त्यांचा ग्राहक आणि त्याची आशय समजून- उमजून घेण्याची क्षमताही या कामी एक वेगळी भूमिका बजावते आहे. 
  • या पूर्वीचा काळ हा माध्यमकर्मींनी पुढे आणलेल्या आशयावर भाष्य करण्याचा काळ होता. 
  • आता केवळ माध्यमकर्मींनी निर्माण केलेला आशयच नव्हे, तर अगदी कुठल्यातरी गल्लीतल्या कोणा एखाद्या व्यक्तीने सोशल मीडिया वापरून अपलोड केलेल्या फोटो आणि व्हिडिओवरही सखोल चर्चा होण्याचा काळ आला आहे. 
  • माध्यमकर्मींची आशय तयार करण्याची मक्तेदारी तशी संपल्यात जमा आहे. सर्वसामान्य नागरिकही आशय तयार करू शकतो आणि समाजमाध्यमांच्या आधारे तो मोठ्या प्रमाणावर प्रसारितही करू शकतो. अर्थात या आशयाच्या सत्यासत्यतेविषयीचे प्रश्नचिन्ह अद्यापही कायमच आहे. 
  • तसेच, या आशयाच्या विश्वासार्हतेविषयी प्रश्न उपस्थित करण्याविषयीच्या सर्वसामान्यांच्या समजेविषयीही आपल्याकडे प्रश्न उपस्थित होऊ शकतो. 
  • त्यामुळे असाच कोणी सर्वसामान्य असल्याचे भासवून सर्वसामान्यांच्या पद्धतीने अगदी हुशारीने आपल्याला हवा तो राजकीय परिणाम साधू शकणारा आशय प्रसारित करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्याही आता वाढू लागली आहे. 
  • भारतात सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होत असताना, २०१४ च्या निवडणुकीपूर्वीच्या काळामध्ये अशी परिस्थिती निर्माण होण्याला चालना मिळाली होती. 
  • त्याचे राजकीय परिणाम त्या निवडणुकीच्या निकालांमधूनही सर्वांनी अनुभवले. 
  • तत्कालीन सत्ताधारी आणि तत्कालीन विरोधक यांच्यामध्ये असलेल्या फरकातला तो कळीचा मुद्दा ठरला होता. आता मात्र केवळ सत्ताधारीच नव्हे, तर विरोधकही या बाबतीत तितकेच सक्रीय झाले आहेत. 
  • अगदी मोजक्या काळामध्ये माध्यमाधारित, विशेषतः सोशल मीडियावर आधारलेल्या राजकारणामध्ये झालेले हे बदल सर्वसामान्य नागरिक आणि अभ्यासकांसाठीही तितकेच महत्त्वाचे ठरणारे आहेत.

(@प्रा.योगेश_बोराटे यांच्या #सोशल_मीडिया या मराठी पुस्तकातून साभार.)
-------------------------------------------------------------
Prof. Yogesh Borate 
Mobile: 9975220225 
या खालील लिंक्सवर हे पुस्तक उपलब्ध आहे.
-------------------------------------------------------------
मित्र हो, हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका. हा लेख जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा. उद्या भेटू यात जागल्याच्या लेख मालिकेत... 
आपल्या काही सूचना असतील तर मेलवर नक्की आम्हाला काळवा.  mejagalya@gmail.com

आमच्या 'जागल्या' व्हाट्सअप समूहामध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा. 
https://chat.whatsapp.com/IogFFXsbTDq5xG5AiybtEf

गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१९

तुम्हाला ‘इन्स्टाग्राम’ची ही फीचर्स माहिती आहेत का?


खास छायाचित्रांसाठीचे म्हणून विकसित झालेले सोशल मीडियाचे व्यासपीठ म्हणून ‘इन्स्टाग्राम’चा विचार केला जातो.
इन्स्ट्राग्रामची सुरुवात १६ जुलै २०१० रोजी झाली. केविन सिस्ट्रोम आणि माइक क्राइगर यांनी इंटरनेटवर छायाचित्रे एकमेकांसोबत शेअर करण्यासाठीचे व्यासपीठ म्हणून ‘इन्स्टाग्राम’ची निर्मिती केली. मोबाइलच्या मदतीने काढलेली छायाचित्रे इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठीचे महत्त्वाचे साधन म्हणून इन्स्टाग्राम विकसित होत गेले. इन्स्टाग्रामच्या मोबाइल अॅप्लिकेशनला सुरुवातीच्या काळामध्येच मिळालेला प्रतिसाद विचारात घेत, २०१२ साली फेसबुकने इन्स्टाग्रामची मालकी स्वतःकडे घेतली. या व्यासपीठावर वापरकर्त्यांना आपण स्वतः काढलेली छायाचित्रे इतरांसमोर मांडण्यासोबतच, आपल्या छायाचित्रांना वेगवेगळ्या फिल्टरच्या मदतीने नवी ओळख देण्याची सुविधाही मिळते. इन्स्टाग्रामवर छायाचित्रांसाठी उपलब्ध असलेल्या नानाविध फिल्टर्सच्या मदतीने सर्वसामान्य व्यक्तींनी काढलेल्या छायाचित्रांना अगदी व्यावसायिक दर्जाच्या छायाचित्रामध्ये रुपांतरित करण्याची सुविधा उपलब्ध आहे. इन्स्टाग्रामच्या मोबाइल अॅप्लिकेशन्समध्ये हे फिल्टर्स अगदी सहजच वापरता येतात. तसेच, या अॅपच्या मदतीनेच एकाच वेळी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आपण काढलेली छायाचित्रे पाठविण्याची आणि इतरांसमोर मांडण्याची सुविधाही उपलब्ध आहे. केवळ मर्यादित स्वरुपात छायाचित्रे इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी म्हणून २०१३ मध्ये इन्स्टाग्रामने आपल्या वापरकर्त्यांना चॅट सर्व्हिसही उपलब्ध करून दिली. त्या आधारे १५ जणांना थेट प्रायव्हेट मेसेज म्हणून छायाचित्रे पाठविणेही शक्य होऊ लागले. इन्स्टाग्रामच्या सुरुवातीपासूनच छायाचित्रांना कॅप्शन देणे, इतरांनी काढलेल्या छायाचित्रांविषयीची आपली मते कमेंट म्हणून मांडणे शक्य होते. इन्स्टाग्रामची मालकी फेसबुककडे आल्यानंतरच्या काळात या अॅप्लिकेशनचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला. फोटो टॅगिंग, एम्बेडेड फोटो, लिंक शेअरिंग आदी सुविधा या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून उपलब्ध होत गेल्या.

(@प्रा.योगेश_बोराटे यांच्या #सोशल_मीडिया या मराठी पुस्तकातून साभार.)
-------------------------------------------------------------
Prof. Yogesh Borate 
Mobile: 9975220225 
या खालील लिंक्सवर हे पुस्तक उपलब्ध आहे.
-------------------------------------------------------------
मित्र हो, हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका. हा लेख जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा. उद्या भेटू यात जागल्याच्या लेख मालिकेत... 
आपल्या काही सूचना असतील तर मेलवर नक्की आम्हाला काळवा.  mejagalya@gmail.com

आमच्या 'जागल्या' व्हाट्सअप समूहामध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा. 
https://chat.whatsapp.com/IogFFXsbTDq5xG5AiybtEf