सोशल मीडियाचे विविध आयामांचा विचार करताना त्याचे वर्गीकरण ही काहीशी अवघड बाब असली, तरी कॅप्लन आणि हैनलैन यांनी दोन प्रमुख मुद्द्यांच्या आधारावर हे वर्गीकरण शक्य असल्याचे दाखवून दिले आहे. या दोघांनी सोशल मीडियाची आशय समृद्धता (मीडिया रीचनेस) किंवा संबंधितांचे व्हर्च्युअल जगतामधील अस्तित्त्व एका बाजूला आणि स्वतःचे सादरीकरण (सेल्फ प्रेझेंटेशन) किंवा स्वतःहून माहिती देण्याचे प्रमाण दुसऱ्या बाजूला ठेवून हे वर्गीकरण केले आहे. या वर्गवारीनुसार, सोशल मीडियाची सहा गटांमधून विभागणी करण्यात आली आहे. हे गट पुढीलप्रमाणे:
१. सामुहिक प्रकल्प:
सोशल मीडियाच्या व्यासपीठांवरून चालणाऱ्या विकिपीडियासारख्या सामुहिक प्रकल्पांमधून एकत्रित आणि एकाच वेळी आशय निर्मितीची प्रक्रिया शक्य होते. या प्रकल्पांसाठी अनेक वापरकर्ते मदत करू शकतात. वापरकर्त्यांकडून होणाऱ्या आशय निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये लोकशाही पद्धतीचा सर्वांधिक वापर होत असलेला सोशल मीडियाचा प्रकार म्हणून कॅप्लन आणि हैनलैन यांनी अशा प्रकल्पांना मान्यता दिली आहे. विकिपीडियासारख्या व्यासपीठावर तुम्ही-आम्ही माहिती देऊ शकतो, ती काढून टाकू शकतो किंवा त्यामध्ये बदल करू शकतो. सोशल बुकमार्किंग साइट्सवर इंटरनेटवरील आशयाच्या लिंक्स किंवा माध्यमाधारित आशय एका सामाईक व्यासपीठावर एकत्रित करणे आणि त्याची क्रमवारी निश्चित करण्याची प्रक्रिया होते. वेबसाइट्स वा विशिष्ट माहिती टॅग करणे, इतरांनी टॅग केलेली माहिती वापरणे आणि त्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधण्याची क्रियाही बुकमार्किंगच्या अशा व्यासपीठांवरून सुरू राहते. ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या न्यायाने या प्रकल्पांचे काम सुरू असते.
२. ब्लॉग आणि मायक्रोब्लॉग:
‘वेब लॉग’ या शब्दांचा एकत्रित अवतार म्हणून आपण ब्लॉग या शब्दाचा विचार करतो. इंटरनेटच्या मदतीने तारखेवार माहिती वा नोंदी करण्यासाठीची उपलब्ध सोय म्हणजे वेब लॉग, अशी ढोबळ व्याख्या आपण सुरुवातीच्या टप्प्यासाठी विचारात घेऊ शकतो. सोशल मीडियाच्या तंत्रज्ञानामध्ये आणि त्यामागच्या विचारप्रवाहांमध्ये उत्क्रांती होत असतानाच्या काळातील अगदी प्राथमिक टप्प्यावरील सोशल मीडियाचा प्रकार म्हणून ब्लॉगकडे पाहिले जाते. सध्याच्या ब्लॉगच्या मदतीने आपण वैयक्तिक माहिती, मत-मतांतरे सार्वजिकरित्या मांडू शकतो. तशी सुविधाच सोशल मीडियाच्या या प्रकाराने उपलब्ध करून दिलेली आहे. सर्वसाधारणपणे एकाच व्यक्तीकडे ब्लॉगची सूत्रे असतात. काही उदाहरणांमध्ये एकापेक्षा अधिक लोक मिळूनही ब्लॉग चालवितात. ब्लॉगचे छोटेखानी स्वरुप म्हणून मायक्रोब्लॉगचा विचार केला जातो. मायक्रोब्लॉगवर वापरकर्त्यांना एका वेळी मर्यादित स्वरुपातील आशयाची निर्मिती करून ती प्रसिद्ध करण्याची संधी मिळते. ट्विटरसारख्या मायक्रोब्लॉगिंग सोशल मीडिया साईटवर असलेली मुद्रित अक्षरांची मर्यादा हे मायक्रोब्लॉग प्रकाराचे एक वैशिष्ट्यच ठरते. लिखित आशयासोबतच अलीकडच्या काळात आशयाच्या इतर प्रकारांचाही ब्लॉगसाठी वापर होऊ लागला आहे. व्हिडिओ ब्लॉगलाही आता चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.
३. कंटेन्ट कम्युनिटीज:
एका विशिष्ट स्वरुपातील आशय इंटरनेट वापकर्त्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी म्हणून कार्यरत व्यासपीठे ही संबंधित आशय प्रकारातील कंटेन्ट कम्युनिटी म्हणून विचारात घेतली जातात. छापील माध्यम (उदा. बूकक्रॉसिंग- पुस्तकांचे शेअरिंग), छायाचित्रे (उदा. फ्लिकर), व्हिडीओ (उदा. यू-ट्यूब), पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन (उदा. स्लाइडशेअर) ही या प्रकारातील सोशल मीडिया व्यासपीठांची काही उदाहरणे होत. या साईट्सवरील आशय वापरण्यासाठी प्रत्येकवेळी तुमचे स्वतःचेच अकाउंट हवे, अशी थेट गरज नसते, हे या प्रकारच्या सोशल मीडिया व्यासपीठांचे एक वैशिष्ट्य समजले जाते.
४. सोशल नेटवर्किंग साईट्स:
तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय असणारा हा सोशल मीडिया प्रकार होय. अशा वेबसाईट्सच्या आधारे तुम्ही तुमचे वैयक्तिक अकाउंट तयार करून त्या आधारे इतरांशी संपर्क प्रस्थापित करू शकता, संपर्क वाढवू शकता किंवा अगदी एखाद्याशी असणारे संबंध तोडूही शकता. अशा वेबसाइट्सच्या आधाराने एकमेकांची माहिती जाणून घेऊन, एकमेकांना ई-मेल्स पाठविणे, इन्स्टंट मेसेज पाठविणेही शक्य होत असते. अशा वेबसाइट्सवरून उपलब्ध असलेल्या वैयक्तिक माहितीमध्ये वेगवेगळ्या आशय प्रकारांवर आधारित माहितीचा समावेश असू शकतो. संबंधित व्यक्तीने स्वतः वा तिच्या संपर्कातील व्यक्तींनी उपलब्ध करून दिलेले फोटो, व्हिडिओ, ऑडिओ फाईल्स, ब्लॉग्सच्या लिंक्स इ. माहितीही या व्यासपीठांवर उपलब्ध होऊ शकते. फेसबुक, मायस्पेससारख्या व्यासपीठांवरून सध्या सातत्याने उपलब्ध होत असलेले अपडेट्स याच प्रकारामध्ये मोडणारे ठरतात.
५. व्हर्च्युअल गेमचे विश्व:
आभासी खेळांच्या या विश्वामध्ये तुम्ही- आम्ही एकमेकांशी स्पर्धा करण्याचा अनुभव घेऊ शकतो. कॉम्प्युटर वा मोबाईल फोन स्क्रीनच्या आधाराने त्रिमितीय वातावरणामध्ये चालणारे हे स्पर्धाविश्व सर्वाधिक समृद्ध आशय असणारा सोशल मीडिया प्रकार मानला जातो. या विश्वामध्ये विशिष्ट नियमांना धरून वागण्याचे एक वेगळे बंधन पाळत स्पर्धकांना एकमेकांशी स्पर्धा करता येते, खेळामध्ये सहभागी होण्याची संधी मिळते.
६. व्हर्च्युअल सोशल वर्ल्ड:
आभासी खेळांच्या पुढचा टप्पा म्हणजे हे आभासी सामाजिक जीवन होय. हे जग आभासी असतानाही वापरकर्ते आपल्या खऱ्याखुऱ्या आयुष्यामध्ये वागतात तसे वागू शकतात. तशी संधी हे जग वापरर्त्यांना मिळवून देते. आभासी खेळांच्या विश्वाला लागू असणारे नियमांचे बंधन या आभासी सामाजिक दुनियेसाठी तसे लागू होत नाही. या बाबीमुळे आभासी खेळांच्या दुनियेपेक्षाही अधिक मोठ्या प्रमाणावर आभासी सामाजिक दुनियेमध्ये वापरकर्ते अधिकाधिक आंतरक्रिया करू शकतात. वापरकर्त्यांना वैयक्तिक पातळीवर स्वतः जसे आहोत, तसे मांडण्याची संधीही हे जग देते. ‘सेकंड लाईफ’सारख्या व्यासपीठांवर तर तुम्ही स्वतःचे कपडेही स्वतः डिझाइन करू शकता. अशा नानाविध संधी हे विश्व तुम्हाला देते.
-------------------------------------------------------------
Prof. Yogesh Borate
Mobile: 9975220225
या खालील लिंक्सवर हे पुस्तक उपलब्ध आहे.
-------------------------------------------------------------
मित्र हो, हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका. हा लेख जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा. उद्या भेटू यात जागल्याच्या लेख मालिकेत...
आपल्या काही सूचना असतील तर मेलवर नक्की आम्हाला काळवा. mejagalya@gmail.com
आपल्या काही सूचना असतील तर मेलवर नक्की आम्हाला काळवा. mejagalya@gmail.com
आमच्या 'जागल्या' व्हाट्सअप समूहामध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/IogFFXsbTDq5xG5AiybtEf

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा