सोशल मीडियाच्या वैशिष्ट्यांचा विचार करताना आपल्याला त्याच्या आशयाच्या काही मूलभूत वैशिष्ट्यांनाही तितकेच महत्त्व द्यावे लागते. त्याच आधारावर तपरैल आणि कन्वर यांनी या माध्यम प्रकाराची वैशिष्ट्ये नोंदविली आहेत. सोशल मीडिया वापरण्यातील सहजता, या माध्यम प्रकारांची गतिमानता, वेब २.० च्या आधाराने येणारा संवादीपणा, आशय उपलब्ध राहण्याचा अमर्याद कालावधी आणि तितकाच अमर्याद विस्तार ही सोशल मीडियाची काही प्रमुख वैशिष्ट्ये ठरत असल्याचे मत या लेखकद्वयीने मांडले आहे. एखाद्याने तयार केलेला आशय इतरांनाही वापरता येण्यासाठीच्या म्हणून उपलब्ध असणाऱ्या विशेष सुविधा आणि विशिष्ट आशय शोधण्यासाठी म्हणून मिळणारी संधी या बाबीही सोशल मीडियाच्या वैशिष्ट्यांचा भाग ठरतात.
वापरण्यातील सहजता:
सोशल मीडियाचा वापर आपण कधी आणि कसा करतो, याचा आढावा घेतला तरी हे वैशिष्ट्य आपण सहजच अनुभवू शकतो. इंटरनेट उपलब्ध असताना एखाद्या अॅपच्या आधारे आपण सहजच या माध्यमविश्वामध्ये प्रवेश करतो. त्यासाठी द्यावा लागणारा मोबदला हा अगदी अत्यल्प असतो किंवा अनेकदा तर असा कोणताही मोबदला द्यावा लागत नाही. सोशल मीडिया वापरण्यासाठी म्हणून तुम्हाला खूप काही विशेष अशा कौशल्यांची तशी कोणतीही गरज उरलेली नाही. अगदी नवशिकी मंडळीही या माध्यमांचा सहजगत्या वापर करतात. या व्यासपीठांवर आपल्या आगमनापूर्वीच उपस्थित असलेल्या एखाद्या गटाचा, समुदायाचा भाग होऊन जाण्याची प्रक्रियाही तितकीच सुलभ आहे, म्हणाल तर अगदी एका क्लिकवर! इंटरनेटचा वापर करू शकणारे कोणीही या समुदायांचा भाग होऊ शकतात. तुम्ही या व्यासपीठांवर आल्यानंतर एखाद्या विशिष्ट हेतूने तुम्हाला स्वतःला तुमचा एखादा गट वा असाच एखादा व्यापक समुदाय तयार करायचा असेल, तर ती प्रक्रियाही तितकीच सुलभ आहे. फेसबुकच्या वेगवेगळ्या कम्युनिटीज किंवा ग्रुप्स आणि त्यामधील तुमचा अंतर्भाव हा याच सुलभतेने सहजसाध्य करून ठेवलेला आहे.
गतिमानता:
हल्ली आपण बहुतांश वेळा एखादी बाब एकाच वेळी हजारो लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ती लिहितो. त्याचा परिणाम म्हणजे त्या व्यासपीठावर तुमच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाला तुम्ही लिहिलेला वा सांगितलेला आशय तत्क्षणी उपलब्ध होतो. त्याचवेळी त्या आशयाला मिळणारा प्रतिसादही तुम्ही जाणून घेत राहता. हा प्रतिसादही तुमच्यापर्यंत अगदी त्याक्षणीच पोहोचविला जातो. हे साध्य होते ते केवळ या माध्यम प्रकारांच्या गतिमानतेच्या बळावर. सोशल मीडियाच्या या गतिमानतेच्या वैशिष्ट्यामुळे सध्या पारंपरिक वृत्तमाध्यमांमधील ब्रेकिंग न्यूजच्या संकल्पनाही बदलून टाकल्या आहेत. तसेच, वृत्तमाध्यमांमधून प्रसारित होणारा आशय अधिकाधिक जनसमुदायापर्यंत पोहोचविण्यासाठी पारंपरिक वृत्तमाध्यमेही सोशल मीडिया व्यासपीठांचा अधिकृतपणे वापर करू लागली आहेत.
आशयातील संवादीपणा (इंटरॅक्टिव्हिटी):
हे तर या माध्यम प्रकारांचे अंगीभूत वैशिष्ट्यच मानले जाते. वेब २.० च्या आधाराने तांत्रिक पाठबळ मिळणाऱ्या सोशल मीडिया व्यासपीठांवर मांडला जाणारा आशय हा केवळ छापील अक्षरे वा चित्रे उरलेला नाही. या आशयाला जिवंतपणा मिळवून देणाऱ्या अनेक बाबी सोशल मीडियावरून संबंधित आशयाला जोडल्या जात आहेत. आशयाला जोडून इतर माहिती देणाऱ्या लिंक्स उपलब्ध करून देण्यासाठी मिळणारी सुविधा, एखाद्या आशयावर प्रतिक्रिया देण्यासाठी म्हणून केला जाणारा इमोजीचा वापर, थेट मुद्रित प्रतिक्रिया नोंदविण्याची सुविधा, या प्रतिक्रियांवर पुन्हा मत-मतांतरे नोंदविण्यासाठी उपलब्ध होणारा मार्ग, प्रश्न विचारणे- मत मांडणे- मतांना अनुमोदन देणे वा विरोध करण्यासाठी म्हणून मिळणारी संधी या माध्यम व्यासपीठांवरील संवाद अधिक व्यापक करू लागल्या आहेत. त्या अर्थाने या माध्यमांवरील आशयाच्या निर्मितीचा विचार करतानाही संबंधितांना केवळ आशयापुरते मर्यादित न राहता, त्याविषयीच्या संभाव्य प्रतिक्रिया, त्यांचे स्वरुप आणि त्याला पुन्हा शक्य असणारा संभाव्य प्रतिसाद यांचाही विचार करणे गरजेचे होऊन बसले आहे.
आशय उपलब्ध राहण्याचा कालावधी: सोशल मीडियावर उपलब्ध झालेला आशय हा वापरकर्त्यांसाठी तसा सदासर्वकाळ उपलब्ध आशय ठरतो. आशयाची निर्मिती करणाऱ्या संबंधिताने हा आशय डिलिट केला, तरीही अनेकदा इतरांनी अशा आशयाच्या केलेल्या साठवणुकीच्या माध्यमातून तो आशय नेमकेपणाने जाणून घेणेही शक्य झाले आहे. आशयाची निर्मिती करणाऱ्या व्यक्तींसाठी तर या माध्यम प्रकारांनी हव्या तेव्हा सुधारणा करण्याच्या आणि संपादन करण्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. इतर माध्यम प्रकारांच्या तुलनेत अशी सुविधा उपलब्ध असणे ही सोशल मीडियाची एक मोठी ताकद मानली जात आहे.
अमर्याद विस्तार:
सोशल मीडियाच्या व्याख्येमध्येच म्हटल्याप्रमाणे हा इंटरनेटवर आधारित माध्यम प्रकार आहे. त्यामुळे इंटरनेटच्या अमर्याद विस्ताराप्रमाणेच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित होणाऱ्या आशयाचा विस्तार हा अमर्यादित अशा स्वरुपाचा बनला आहे. सोशल मीडियाच्या समान व्यासपीठाचा वापर करणारे कोणीही कोणत्याही ठिकाणाहून आणि कोणत्याही वेळी संबंधित व्यासपीठावर उपलब्ध झालेला आशय अनुभवू शकतात, वापरू शकतात किंवा आपल्या खात्यामधून इतरांपर्यंतही पोहचवू शकतात. त्यासाठी संबंधित व्यासपीठाचा वापर करू शकणाऱ्या प्रत्येकालाच समसमान संधी उपलब्ध आहे. त्यासाठी कोणत्याही भौगोलिक, राष्ट्रीय सीमांचे बंधन नाही, हेही सोशल मीडियाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरते.
'सोशल मीडिया - परस्पर संवाद का वेब आधारित गतिशील मंच’ या विशेष लेखाच्या माध्यमातून अभ्यासक ओम प्रकाश दास यांनी सोशल मीडियाच्या वेगळेपणावर प्रकाश टाकला आहे. दास म्हणतात, “सोशल नेटवर्किंग साइट्स संपर्क व माहितीचे सक्षम माध्यम आहे. या माध्यमातून लोक आपले मत, विचार कोणत्याही अडथळ्याविना मांडू शकतात. इथूनच सोशल मीडियाचे स्वरुप विकसित झाले आहे. फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर वापरकर्त्यांचे वर्गीकरण काही बाबींच्या आधारे केले जाते. वय, आवड, लिंग, फेसबुकचा वापर आदी लक्षात घेऊन ही वर्गवारी होते. त्यानुसार जाहिराती दाखवल्या जातात. या जाहिरातींचा सकारात्मक परिणामही दिसू लागला आहे. त्याचबरोबर त्या विषयीच्या दुष्परिणामांविषयी टीकाही केली जात आहे.
-------------------------------------------------------------
Prof. Yogesh Borate
Mobile: 9975220225
या खालील लिंक्सवर हे पुस्तक उपलब्ध आहे.
-------------------------------------------------------------
मित्र हो, हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका. हा लेख जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा. उद्या भेटू यात जागल्याच्या लेख मालिकेत...
आपल्या काही सूचना असतील तर मेलवर नक्की आम्हाला काळवा. mejagalya@gmail.com
आपल्या काही सूचना असतील तर मेलवर नक्की आम्हाला काळवा. mejagalya@gmail.com
आमच्या 'जागल्या' व्हाट्सअप समूहामध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/IogFFXsbTDq5xG5AiybtEf

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा