मंगळवार, २३ जुलै, २०१९

समजावून घ्या SIP युनिटसचा झांगडगुत्ता

  योगेश पवार
                  लेख वाचण्यासाठी अपेक्षित वेळ: ०4 मिनिटे 
शेअर बाजाराची फारशी माहिती नसतानाही तुलनेने कमी जोखीम घेऊन बँकेतील गुंतवणुकीपेक्षा जास्त फायदा मिळवायचा असेल, तर त्यासाठी उत्तम मार्ग म्हणजे एसआयपी. SIP मध्ये युनिट्स महत्त्वाचे असतात. समजावून घ्या SIP युनिटचा झांगडगुत्ता.
आजकाल बहुतेक गुंतवणूक सल्लागार ‘एसआयपी’द्वारे म्युच्युअल फंडांत गुंतवणूक सुरू करण्याचा सल्ला देत असल्याचे दिसून येते. इतकेच नव्हे, तर वर्तमानपत्रात, टीव्हीवर याबाबतच्या जाहिराती वरचेवर दिसून येतात; पण सामान्य गुंतवणूकदारास याबाबत पुरेशी माहिती असतेच असे नाही. किंबहुना बहुतेक जण याबाबत अनभिज्ञच असल्याचे दिसून येते. 
एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ठराविक कालावधीने (वारंवारिता) एक ठराविक रक्कम आपण निवडलेल्या म्युच्युअल फंडाच्या योजनेत ठराविक कालावधीसाठी अथवा आपणास हवे तोपर्यंत गुंतविणे, म्हणजे एसआयपी. बहुतांश गुंतवणूकदारांना ही वारंवारिता (फ्रिक्वेन्सी) एका महिन्याची असणे सोयीस्कर वाटते. एकूण कालावधी दोन, तीन, पाच, सात वर्षे असा ठेवला जातो. हा एकूण कालावधी आपल्या गरजेनुसार कितीही असू शकतो; मात्र फ्रिक्वेन्सी तिमाही, सहामाही, वार्षिकसुद्धा ठेवता येते. एकदा आपला कालावधी निश्चित झाला, की संबंधित म्युच्युअल फंडाच्या अर्जासोबत आपल्या बँकेत दरमहा ठरविलेली रक्कम नावे टाकण्यासाठी म्युच्युअल फंडाच्या नावाने ईसीएस फॉर्म भरून द्यावा लागतो. तसेच सुरुवातीच्या गुंतवणुकीचा चेक द्यावा लागतो. आपण दर महिन्याची एक, पाच, १०, १५, २०, २५ यापैकी आपल्याला सोयीस्कर अशी कोणतीही एक तारीख निवडू शकतो. म्युच्युअल फंडानुसार या तारखा थोड्याफार वेगळ्या असू शकतात. पुढील महिन्यापासून आपण निवडलेल्या तारखेला ठरविलेली रक्कम आपल्या बँक खात्यातून जमा होते. खरी गंमत तर खाली आहे.

                    संदर्भ: फोटो नेटवरून साभार

एसआयपी गुंतवणूक फायदेशीर कशी ठरते, हे एका उदाहरणावरून पाहू. समीरने दरमहा पाच हजार रुपये एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या इक्विटी फंडात पुढील पाच वर्षांसाठी गुंतविण्यासाठी एसआयपी नुकतीच सुरू केली आहे. त्याचा पहिला चेक पाच तारखेला जमा झाला आहे. या फंडाची त्या दिवशीची नेट असेट व्हॅल्यू (एनएव्ही) ६४५ रुपये असली, तर त्याच्या नावावर पाच हजार भागिले ६४५ म्हणजेच ७.७५ युनिट जमा होतील. पुढील महिन्यात पाच तारखेला पाच हजार रुपये भरले गेल्यानंतर त्या वेळी एनएव्ही ६८० रुपये असेल, तर त्याच्या नावावर पाच हजार भागिले ६८० म्हणजेच ७.३५ युनिट जमा होतील. त्यापुढील महिन्यात शेअर बाजार पडला व एनएव्ही ६३५ रुपये झाली, तर पाच हजार भागिले ६३५ म्हणजे ७.९१ युनिट जमा होतील. त्यापुढे दरमहा पाच हजार रुपये फंडात जमा होतील आणि दर महिन्याच्या पाच तारखेला एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या इक्विटी फंडाच्या युनिटची जी किंमत असेल, त्यानुसार युनिट्स समीरच्या खात्यात जमा होतील. बाजारातील चढ-उतार विचारात घेता दर महिन्याला कमी-अधिक युनिट समीरच्या नावावर जमा होत राहतील. समजा पुढील पाच वर्षांत त्याच्या नावावर एकूण ३३९ युनिट्स जमा झाले आणि त्या वेळचा प्रति युनिटचा भाव १३४४ रुपये असेल, तर त्याची बाजारातील किंमत (मार्केट व्हॅल्यू) ३३९ गुणिले १३४४ म्हणजेच चार लाख ५५ हजार ६१६ रुपये होईल. यात परताव्याचा दर १६ टक्के इतका असेल आणि तो प्रचलित बँक रिटर्नच्या तुलनेत खूपच चांगला असेल. अर्थात, एक गोष्ट आहे, की यामध्ये नेमका किती रिटर्न मिळेल हे खात्रीशीर सांगता येत नाही. मिळणारा रिटर्न हा त्या कालावधीतील बाजारातील चढ-उतार व आपण जेव्हा पैसे काढणार आहात, त्या वेळचे युनिटचे मूल्य (एनएव्ही) यावर अवलंबून असेल.
असे असले तरी, आपण बाजार पडला असेल अशा वेळी रक्कम न काढता बाजार तेजीत असताना रक्कम काढल्यास नक्कीच फायदा होईल. आपल्याला रकमेची तातडीची गरज असेल, तर संपूर्ण रक्कम न काढता, हवी तेवढीच रक्कम काढून संभाव्य नुकसान टाळता येते. ज्या गुंतवणुकदारांना नियमित गुंतवणूक करावयाची आहे आणि शेअर बाजाराची माहिती नाही अशा गुंतवणूकदारांनी ‘एसआयपी’पासून सुरुवात करावी.
------------------------------------------------
- योगेश पवार 
(Pawer Financial Services, Ahmednagar) 
84 84 84 32 26 / 94 04 82 26 59 
---------------------------------------------------
आपल्या कशी शंका असल्यास आपण थेट लेखकाशी संपर्क साधू शकता. 
मित्र हो,
हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका. 
हा लेख जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा. 
उद्या भेटू यात  जागल्याच्या लेख मालिकेत... 
------------------------------------------
आपल्या काही सूचना असतील तर खालील मेलवर नक्की आम्हाला काळवा. 
mejagalya@gmail.com

आमच्या 'जागल्या' व्हाट्सअप समूहामध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा. 
https://chat.whatsapp.com/IogFFXsbTDq5xG5AiybtEf

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा