शुक्रवार, १९ जुलै, २०१९

विज्ञानयात्री: डॉ. जयंत नारळीकर

    जयंत विष्णू नारळीकर
(फोटो: नेटवरून साभार)
जयंत नारळीकर हे मराठी विज्ञान साहित्यातील एक महत्त्वाचे लेखक. 'खगोलशास्त्र' हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. शास्त्रज्ञ आणि लेखक म्हणून त्यांचा विज्ञानक्षेत्रात असलेला दबदबा सर्वांनाच ज्ञात आहे.'चार नगरातले माझे विश्व' हे त्यांचे आत्मचरित्र नारळीकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविधांगी पैलू उलगडून दाखवणारे आहे. आज 19 जुलै हा त्यांचा जन्मदिवस, त्यानिमित्तानं त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला हा वेध...

नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे जुलै १९, १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ज्ञ. वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागाचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानाची पदवी (B.Sc.) प्राप्त केली. या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांनी बीए, एमए व पीएचडी च्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल व इतर अनेक बक्षिसे मिळाली. १९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा व लीलावती. १९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. डॉ. नारळीकर यांच्या पत्‍नी मंगला नारळीकर ह्या 'नभात हसते तारे' या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. 'पाहिलेले देश भेटलेली माणसं' हे त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले पुस्तक आहे.

स्थिर स्थिती सिद्धान्त
डॉ. जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ मांडली. चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्‍न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.

लेखनप्रपंच: 
विविध मराठी नियतकालिकांतून जयंत नारळीकर यांचे सातत्याने विज्ञानविषयक माहितीने भरलेले ललित लेखन प्रसिद्ध होत असते. नारळीकरांच्या पुस्तकांची जगांतील अनेक भाषांत रूपांतरे झाली आहेत.

साहित्यसंपदा:
  • अंतराळातील भस्मासुर
  • अभयारण्य 
  • टाइम मशीनची किमया 
  • प्रेषित यक्षांची देणगी 
  • याला जीवन ऐसे नाव 
  • वामन परत न आला 
  • व्हायरस
  • आकाशाशी जडले नाते 
  • गणितातील गमतीजमती 
  • युगायुगाची जुगलबंदी 
  • गणित अन्‌ विज्ञानाची (आगामी) 
  • नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर) 
  • विज्ञान आणि वैज्ञानिक 
  • विज्ञानगंगेची अवखळ वळणे 
  • विज्ञानाची गरुडझेप 
  • विश्वाची रचना 
  • विज्ञानाचे रचयिते 
  • सूर्याचा प्रकोप 
  • Facts And Speculations In Cosmology (सहलेखक : Geoffrey Burbidge) 
  • Seven Wonders Of The Cosmos
'चार नगरांतले माझे विश्व' हे त्यांचे आत्मचरित्र विशेष प्रसिद्ध आहे.
पुरस्कार
  • १९६५मध्ये त्यांना 'पद्मभूषण' पुरस्कार मिळाला. 
  • २००४मध्ये त्यांना 'पद्मविभूषण' पुरस्कार मिळाला. 
  • २०१०मध्ये त्यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार मिळाला. 
  • 'भटनागर' पुरस्कार आणि 'एम. पी. बिरला' हे पुरस्कारही मिळाले आहेत. 
  • २०१४ साली मिळालेला तेनाली (हैदराबाद) येथील नायुद‍अम्मा ट्रस्टचा 'डॉ. वाय. नायुद‍अम्मा स्मृती पुरस्कार' (२०१३) 
  • जयंत नारळीकर यांच्या आत्मचरित्राला दिल्लीच्या 'साहित्य अकादमीचा पुरस्कार' (२०१४)  मिळाला आहे. 
  • 'यक्षाची देणगी' या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार,
  • अमेरिकेतील फाउंडेशनतर्फे दिला जाणारा 'साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार' (२०१२)
डॉ. विजया वाड यांनी डॉ. नारळीकर यांचे 'विज्ञानयात्री डॉ. जयंत नारळीकर' या नावाचे चरित्र लिहिले आहे.

शाॅर्ट फिल्म
खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या व्यक्तित्वाचा आणि कर्तृत्वाचा वेध एका लघुपटाद्वारे घेतला गेला आहे. साहित्य अकादमीची निर्मिती असलेल्या एका तासाच्या या लघुपटाचे दिग्दर्शन अनिल झणकर यांनी केले आहे.
-------------------------------------------------
संदर्भ: whatsapp समूहावरून साभार  https://www.facebook.com/दिनविशेष-आणि विज्ञान -501443670 04332/
--------------------------------------------------

मित्र हो,
हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका. 
हा लेख जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा. 
उद्या भेटू यात जागल्याच्या लेख मालिकेत... 
------------------------------------------
आपल्या सूचनासह आपल्या प्रतिक्रिया मेल करा.  आणि कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. 
mejagalya@gmail.com

आमच्या 'जागल्या' व्हाट्सअप समूहामध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/IogFFXsbTDq5xG5AiybtEf

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा