गुरुवार, ७ मार्च, २०१९

जटांच्या जोखडातून महिलांना मुक्त करण्याचा ध्यास घेतलेल्या नंदिनीताई : - हिनाकौसर खान-पिंजार


बायकांच्या डोक्यातल्या जटा हा आजही सामाजिक प्रश्‍न आहे. जटांचा संबंध श्रद्धेशी, पाप-पुण्याशी जोडला जात असल्याने जटांना  हात लावायला कुणी धजावत नाही आणि म्हणून कित्येकजणी अशा नजरेस येत राहतात. मात्र हे काम करायला महाराष्ट्र अंधश्रद्धा निमुर्लन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव या नेहमीच तत्पर असतात. आत्तापर्यंत त्यांनी पुणे जिल्ह्यातील ९६ तर राज्याच्या इतर  भागातील १२ आशा १०६ जणींना जटमुक्त केलं आहे.
 वेगवेगळ्या स्तरातील आणि वेगवेगळ्या गटातील मुली/बायकांना त्यांनी जटाच्या ओझ्यातून मुक्ती दिली आहे. ही मुक्ती नुसती डोक्यावरच्या जटांचीच नसते तर त्यासोबतीने येणाऱ्या अनेकविध अंधश्रद्धातूनही बायका आणि त्यांचे कुटुंब आपसूकच बाहेर पडतात.

अर्थात ही किमया एका दिवसात घडत नाही. त्यासाठी सतत पाठपुरावा करावा लागतो, अपमान गिळावा लागतो आणि प्रसंगी आवाजही चढवावा लागतो. नंदिनी जाधव हे सगळं मन लावून करतात.

मध्यमवर्गीय सुखवस्तू घरातल्या नंदिनी जाधव या खरंतर मेकअप आर्टिस्ट. ब्युटिशियन्ससाठी महत्त्वाचा असणाऱ्या लंडनच्या सिडास्कोमधून त्यांनी पार्लरसंबंधी सखोल प्रशिक्षण घेतलंय. कॉलेजवयात त्या व्हॉलीबॉल, भालाफेक या खेळात राष्ट्रीय खेळाडू राहिल्यात. व्हॉलीबॉलच्या सांघिक पातळीवर राष्ट्रीय खेळाडू म्हणून सलग पाच वर्षे खेळत होत्या. उंचपुऱ्या, शिडशिडीत बांध्याच्या, ‘रॉयल एनफिल्ड’वर रूबाबदारपणे वावरणार्‍या नंदिनी जाधव यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वावर खेळाडूपणाची छाप दिसतेच. त्यांचं एकूण व्यक्तीमत्त्वच धडाकेबाज असले तरी त्या प्रचंड संवेदनशील आहेत. बी. ए. चे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांनी स्त्री अभ्यास केंद्रातून शिक्षण घेतले. त्यानंतर एमएसडब्ल्यूदेखील केले. पहिल्यापासूनच समाजकार्याची आवड होती. विधवा, परित्यक्त्या महिलांना फॅशन डिझायनिंगचे कोर्सेस शिकव, शाळेत लाठीकाठीचे प्रशिक्षण दे, ग्रामीण महिलांना मोफत प्रशिक्षण दे अशा स्वरूपात त्या काम करतच होत्या. रेड लाईट एरिया मध्ये दोन वर्षे काम केले. तसेच अंध,अपंग,अनाथ आश्रम मधील मुलांना विविध क्राफ्टचे मोफत प्रशिक्षण शिबिर घेणे अशा विविध स्वरूपातील कामे त्या करतच होत्या. मात्र २०१२ मध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकरांशी त्यांचा परिचय झाला आणि त्या तेव्हांपासून  अंधश्रद्धा निर्मुलन समितीसोबत जोडल्या गेल्या.

 अंनिससोबत प्रवास सुरु केल्यावर त्यांना महिलांचे प्रश्न अधिक जवळून कळू लागले. त्यांच्यात उपजत असणाऱ्या कार्यकर्तेपणाला इथं दिशा मिळू लागली. आणि अगदी थोड्याच दिवसात त्यांच्याकडे जटनिर्मूलनाची पहिली केस आली, ८ मार्च २०१३ रोजी. पुण्यातल्या जनवाडी या भागात हा प्रसंग घडला. तिथल्या १६ वर्षाच्या मुलीच्या डोक्यात जट दिसली होती. त्यामुळे कुटुंबियांनी घाबरुन तिला शाळेतून सोडवून घरी बसवलं होतं आणि ते तिला कर्नाटकातील सौंदती देवीच्या मंदीरात नेऊन देवदासी होण्यासाठी सोडणार होते. त्या मुलीच्या मैत्रिणींनी ही माहिती अंनिसपर्यंत पोहचवली.
नंदिनीताई सांगतात, "आम्ही लगेच तिच्या घरी पोहचलो. सुरूवातीला तिच्या कुटुंबियांनी आमच्या घरातला मामला आहे म्हणत हाकललं. पण आम्ही धीर सोडला नाही. दिवसभर बसून राहिलो, त्यांना जट कशी येते सांगू लागलो. देवीचा कोप होत नाही हे समजावलं बराच काथ्याकुट केला. मी जटा कापणार आहे; त्यामुळे जो काही कोप व्हायचा तो माझ्यावर होईल असं निर्वाणीचं सांगितलं. माध्यमातही ही बातमी पसरली. दबाव निर्माण झाल्याने शेवटी ते तयार झाले. १६ वर्षांची मुलगी पुढच्या भयंकर त्रासापासून वाचली.’’

खरंच होतं ते, देवदासी होऊन तिच्या आयुष्याचं मातेरंच झालं असतं. मुली/बायांच्या डोक्यात जट आली की अनेकदा कर्नाटकातील सौंदतीदेवीला सोडून देण्याचे प्रकार घडतात. पुढे त्यांना देवदासी करून उपभोगलं जातं. काहींची परवड वेश्यावस्तीत होते. काही जणींना देवत्व देऊन सांसारिक जगण्यातून मुक्त केलं जातं. तर काही जणींना हळदी कुंकूचा टोपलं घेऊन रस्तोरस्ती फिरतात आणि दान मिळवत असतात. तो त्यांच्या उत्पन्नाचा भाग असतो. जबरदस्ती बायकांना हे करण्यासाठी भाग पाडलं जातं. पण या जट निर्माण होतात कशा? हा प्रश्न सतावत होता. त्यावर नंदिनीताई म्हणाल्या, जटा या बहुतेककरुन मानेपासून सुरू होतात. तिथून नीट कंगव्याने विंचरलं जात नाही. अनेकदा केसांना तेल लावलं जात नाही. मग त्यात धुळ, माती किंवा काहीतरी कचरा केसांत जाऊन अडकतो. केस नीट विंचरले जात नाहीत तसे स्वच्छ धुतले जात नाहीत. शॉम्पूने नीट न धुतल्याने केसातली घाण तशीच राहते आणि त्याचा गुंता तयार होत जातो. तो मानेवरच्या केसांमध्ये अडकल्याने वर चटकन दिसतही नाही. पुढे त्यात केस अडकत जातात आणि जट निर्माण झाली असं लोकांना वाटतं.’’

अशा जटा निर्माण होण्यामध्ये काहीवेळा बायकांच्या कामाचे स्वरूपही कारणीभूत असायचे. कचरा वेचणे, वाळू-मातीतले काम करणे, शेतातले काम करणे.  त्यांच्या कामातून कचरा, माती किंवा शेतकरी बायांबाबत एखाद गवत केसात अडकतं आणि पुढे जटा तयार होतात. त्यांनी लगेच एक उदाहरण दिलं, एकदा तरूणीच्या केसात जटा निर्माण झाल्या होत्या. खोदून खोदून विचारल्यावर कळालं की ती उडदाच्या पापड्या करण्याचा व्यवसाय करते. पापड  लाटताना तिने कधीतरी मानेवरचे केस मागे सारले तेव्हा त्यात उडदाचं चिकट पीठ लागलं असणार. असं सतत होत गेलं आणि जट झाली.  थोडक्यात केसांची अस्वच्छता हा जटांना आंमत्रित करणारा प्रकार. आपले केस स्वच्छ धुणे, गुंता झाल्यास नीट सोडवणे, एक एक केस मोकळे करणे, वेळोवेळी तेल लावणे या गोष्टीं केल्यास जटा होण्याचं कारणच नाही.’’

एखादी जट निर्माण झाली की संपूर्ण केसांत कशी होत असतील? काही बायकांचे ते पुर्णच्या पूर्ण केस जटयुक्त दिसतात. तर त्याचं उत्तर पुन्हा अस्वच्छतेशीच निगडीत होतं. एकदा जट निर्माण झाली की बायकांना लाज वाटते आणि त्या ते लपवून ठेवण्याचा प्रकार करतात त्यासाठी डोक्यावरून पदर घेतात. त्यातून मग उर्वरित केसांमध्येही घाण साचायला लागते. आंघोळ केल्यानंतरही नीट न सुकवल्याने त्यातली घाण निघत नाही. केस नीट वाळवले जात नाहीत. उलट पुन्हा लगेच ओलेच बांधून टाकले जातात. यातून एका जटाची लागण सगळ्या केसांना व्हायला लागते. त्यामुळेच तर नंदिनीताई सांगू लागल्या की काही बायकांच्या तर अगदी ८-१० किलो वजनाच्या जटा होत्या. अगदी पाच किलोपासून ते अकरा किलोपर्यंतच्या जटा सोडवल्या आहेत. अनेकदा या जटांमध्ये अळ्या, उवा, लिका असतात. प्रचंड वास येत असतो. बायका अंधश्रद्धेपोटी त्या आपल्या डोक्यावर घेऊन वावरत असतात. आपण जटा कापताना तर इतर कोणी थांबूही शकणार नाही इतका घाणेरडा वास येत असतो. जटा कापल्यानंतर बायकांना खूप हलकं हलकं वाटतं. असं बायकाच आनंदाने सांगतात. पण कापलेल्या जटा या घाण आहेत याविषयी तरीही त्यांच्या मनात शंका असते. म्हणूनच ते पुन्हा त्या जटा नदीत विसर्जित करू असं म्हणायला लागतात. पण शेवटी जटांमधली एकुण घाण आणि कचरा दाखवल्यावर जटांची विल्हेवाट रीतसर कचऱ्यात लावली जाते. ’’

अनेकदा जट आलेल्या बायकांच्या अंगातही येत असल्याचं आपल्याला पहायला मिळतं. पण अंगात येणं हा देखील एक मानसिक आजाराच असल्याचे नंदिनीताई सांगत होत्या. ‘काही जणी तर चक्क सोंग करतात. याविषयी नंदिनीताई सांगतात, अंगात येणं हा हिस्टेरिया प्रकार असतो. मानसिक तणाव असह्य झाला की त्या अशा विचित्र वागतात. केसात जट झाली की त्यांना अनेक शुभकार्यापासून दूर ठेवलं जातं. वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय सुरु होतात. यातून त्या मानसिक नैराश्यात जातात. ते कुठंतरी बाहेर काढण्याचं काम त्यांचं हे अंगात येणं करत असतं. त्यासाठीसुद्धा डॉक्टरांची मदत घेण्याची गरज असते. ’’

जटा आणि अंधश्रद्धेचाही संबंध आहे आणि जट झाली म्हणजे बाईने काहीतरी पाप केलंय असा विचार कुटुंबातूनच व्हायला लागतो. त्यामुळे तिला वाळीत टाकण्याचा प्रकार सुरु होतो. मग देवीचा कोप घालविण्यासाठी बोकड कापायची युक्ती बुवाबाबा त्यांना देतात. यासाठी अनेक जण कर्ज काढतात. कारण याचा खर्च कमीतकमी लाखाच्या घरात सांगितलेला असतो. पण त्या जटेला घाबरुन लोक अशा प्रकारच्या अंधश्रद्धांना बळी पडतात. हा प्रकार अशिक्षितांमध्येच नव्हे तर उच्चशिक्षितांमध्येही आढळत असल्याचे नंदिनीताई सांगतात. त्यांच्याकडे एका बँकेचा मॅनेजर आपल्या बायकोला घेऊन आला होता. बायकोच्या डोक्यात जट झाल्याने सात वर्षांपासून त्याने तिला स्पर्शही केला नव्हता. तिला कुठल्याही सण समारंभात घेऊन जात नसायचा. तो उच्च शिक्षित उच्च पदस्थ असूनही त्याला जट सोडविण्याविषयी शंका वाटत होती. कुटूंबातील कोणी मरेल अशी त्याला भिती होती. अर्थात नंदिनीताईंच्या सातत्याने समुपदेशनानंतर त्या बाईची जट सोडवण्यात आली परंतु इतक्या साध्या गोष्टीसाठी तो सात वर्ष बायकोशी धड बोलला नव्हता. एकप्रकारे स्त्रियांवर हाही अन्यायच!

जटनिर्मूलनाबाबत लोकांच्या मनात अंधश्रद्धांचं घर असल्याने जट सोडविण्याआधी अंनिसच्यावतीने एक अर्ज भरून घेतला जातो.  याविषयी नंदिनीताई म्हणाल्य,जट कशी येते, का येते असं सगळं नीट समजावून सांगितलेलं असतं. लोकांच्या मनातील शंका दूर होईपर्यंत आम्ही विवेकानं उत्तर देतो. ज्या बाईच्या डोक्यात जटा आहेत तिची आणि तिच्या कुटुंबियांची दोघांची तयारी करुन घेतो. त्यांची इच्छा आणि परवानगी असेल तरच आम्ही जटा सोडवतो. कोणावर कसलीही जबरदस्ती करत नाही. फक्त त्यांना विवेकाचा मार्ग सांगत राहतो. एकदा का तयारी झाली की त्यांच्याकडून एक परवानगीचा अर्ज भरून घेतला जातो.  कारण जट निमूर्लनानंतर कोणतीही अनिष्ठ गोष्ट घडणार नसते परंतु कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक वेळ झाली असा प्रसंग आल्यास त्यांची रीतसर परवानगी आपल्याकडे हवी म्हणून आम्ही हा उपद्व्याप करतो. मी तर जट सोडविण्यासाठी मंगळवार आणि शुक्रवारचा दिवस निवडते. हे दोन्ही दिवस देवीचे मानले जातात. त्यामुळे त्याबाबतची भीतीही कमी होते. जट सोडवल्यानंतरही आम्ही त्यांच्याशी संपर्क ठेवतो. त्यांची विचारपूस करत राहतो. ’’

नंदिनीताईंनी पुणेशहर व जिल्ह्यातील एकूण ४० जणींना जटमुक्त केलं आहे. त्यांच्या कोणाच्याही घरात काही अनिष्ठ घडलं नाही. उलट त्या बायकांच्या डोक्यावरची घाण कमी झाली आणि त्या मोकळ्या जगू लागल्या आहेत. या सगळ्यात नंदिनीताईंना माध्यमांची मदतही तितकीच महत्त्वाची वाटते कारण काही जणींनी वर्तमानपत्रातील बातम्या वाचून जट सोडवण्याचा निर्णय घेणार्यांही महिला त्यांना भेटल्या. एका रिक्षावाल्याच्या बायकोच्या जटा सोडवल्यानंतर त्याला यातील अंधश्रद्धेचा फोलपणा इतका पटला.आता तो स्वत:हून अशी कोणी बाई दिसली; की तिची नंदिनीताईंना गाठ घालून देतो. हा सकारात्मक बदल दिसत आहे.

लवकरच संपूर्ण पुणे जिल्हा जटनिर्मूलन करण्याचा ध्यास नंदिनीताईंनी घेतला आहे. अंनिसशी २०१२ नंतर जोडल्या गेल्यानंतर नंदिनीताईंनी अल्पावधीतच कार्यकर्त्याची बांधिलकी स्विकारली. आजवर त्यांनी ५० बाबाबुवा, बोगस डॉक्टरांना उघडं पाडलं. चमत्कारा, स्त्री व अंधश्रद्धा याविषयी २७ जिल्ह्यांत १२०० व्याख्याने दिली. जादूटोणा कायद्याच्या प्रसारासाठी महाराष्ट्रात २७ जिल्ह्यात सलग ४९ दिवस फिरल्या. नेटाने काम करत आहेत.

बुवाबाजी व जात पंचायत,बोगस डॉक्टर याबाबत जवळपास चाळीस प्रकरणे स्वतः हाताळली.जादूटोणा कायदा होण्यासाठी नागपूर येथील आंदोलनात सलग पंधरा दिवस उपस्थिती नंतर कायदा समजावून सांगण्यासाठी काढलेल्या दौरात ४९ दिवसात २७ जिल्ह्याचा दौरा करून जादुटोणा कायद्याचा प्रचार आणी प्रसार आतापर्यंत  चमत्कार व्याख्याने २२००हुन अधिक दिले. दोन वर्षांचा पुणे जिल्हा कार्याध्यक्ष कार्यकाल संपल्यानंतर यावर्षी पुन्हा त्यांची पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पदी  फेर निवड झाली आहे.
 त्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,प्रबोधनकार ठाकरे,राज्य महिला आयोगाकडून मॅक्स महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

नंदिनीताई म्हणतात, ‘ही प्रेरणा डॉक्टर दाभोळकरांकडून  मिळाली. २० ऑगस्ट २०१३ रोजी डॉक्टरांचा खून झाला. त्यावेळी मी खूप अस्वस्थ झाले. समाजासाठी काम करायचं असेल तर ते असं झोकून देऊन करायला हवं ही जाणिव प्रकर्षाने जाणवत राहिली.’ नुसती अशी जाणिव वाटून उपयोग नव्हता कृती आवश्यक होती. पुण्यातील हडपसर येथील २ हजार चौफुटातील दरमहा साधारण १ लाख उत्पन्न मिळवून देणारं स्वत:चं पार्लर त्यांनी २०१३ मध्येच बंद केलं. असं धाडस करायला खरंच जिगर लागते. स्त्रियांचे बाह्यसौंदर्य खुलवण्यापेक्षा त्यांचे वैचारिक सौंदर्य खुलवणे अधिक महत्त्वाचे असा मौलिक विचार घेऊन त्या अथकपणे कार्यरत आहेत.

- हिनाकौसर खान-पिंजार
   संपर्क - ९८५०३०८२००
लेखिका मुक्त पत्रकार असून साधना साप्ताहिकात कार्यरत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा