बुधवार, २७ फेब्रुवारी, २०१९

भलरी : शेतकऱ्यांचे जीवनगाणे गाणारी कविता


मराठीतील 'भलरी' या लोकगीतांवर डॉ. संदीप रतन कांबळे यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. त्यांनी ग्रामीण भागात मैलोनमैल भटकंती करून या भलरी लोकगीतांचा वेध घेतला आहे.  मराठी भाषा गौरव दिनानिमित्त त्यांच्याच शब्दांतून समजून घेऊ 'भलरी' लोकगीत.
…..........

ज्वारी, बाजरी, गहू काढताना आणि ऊसतोडणी करताना शारीरिक थकवा येतो, अशी कष्टाची कामे करताना थकवा जाणवू नये, श्रमपरिहार व्हावा, कापणी करताना उत्साह वाढावा, एकमेकांना स्फूर्ती मिळावी यासाठी समूहाने जी गाणी म्हटली जातात, त्या गीतांना ‘भलरी’ असे म्हणतात. या गीतांना कैक वर्षांची परंपरा आहे. एक वाक्यात सांगायचे झाले तर, थोडक्यात कमरेत वाकून श्रमपरिहार व्हावा म्हणून जी सुगीची कामे करताना गाणी म्हटली जातात, त्या गाण्यांनाच ‘भलरी’ म्हणतात.

भलरी’ हे लोकगीत सुद्धा एक ग्रामीण कविताच आहे, हे आपल्या लक्षात येते. परंतु तिचा कर्ता कोण? असा प्रश्न उपस्थित झाला तर तिचा कर्ता हा अनामिक असल्याने ती या शेतकऱ्यांचे जीवनगाणे गाणारी निरक्षरांची कविता आहे, असे ठामपणे सांगता येते.
एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही गाणी सतत हस्तांतरित होत जातात. महाराष्ट्रात या श्रमगीतांना ‘भलरी’ हाच शब्द सर्वमान्य प्रचलित असला, तरी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आणि नंदुरबार जिल्ह्यात विशेषता आदिवासीबहुल भागात तो ‘गायन्या’ या नावाने प्रसिद्ध आहे. बंजारा जातीमध्ये लमानी भाषेत भलरीला ‘लेंगी’ असे म्हणतात. पश्चिम बंगालमध्ये ‘सौताल’, बिहारमध्ये ‘सताल’ तर हिमाचल प्रदेशमध्ये भलरीला ‘मैना’ तर केरळमध्ये या श्रमपरिहाराच्या गाण्याला ‘कोथिऊ पट्टाऊ’ असे म्हणतात. ‘भलरी’त बोली रूप आलेले आहे.

‘भलरी’ या लोकगीताला एक विशिष्ट प्रकारची चाल असते. हरभरा, सोयाबीन, भूईमूग अशा खुरट्या पिकांची काढणी करत्यावेळी बसून भलरी म्हटल्या जातात, त्यास ‘बैठी भलरी’ असे म्हणतात. काही ‘भलऱ्या' गौळण, अभंग, नव्या-जुन्या गाण्यांच्या उडत्या चालीवर गायल्या जातात. जशी ठसकेबाज ‘लावणी’ तशी ठसकेबाज ‘भलरी’ म्हणूनही ‘भलरी’ची स्वतंत्र ओळख सांगता येते. ‘भलरी’ लोकगीतात समाजजीवनाचे यथार्थ पण हुबेहूब वर्णन आलेले आहे.

 भलरी लोकगीतः रचनाबंध आणि संकलनः

‘भलरी’ या लोकगीतांचा रचनाबंध हा काव्यरचनेच्या रचनाबंधाशी तंतोतंत मिळता जुळता असल्याचे दिसून येते. कवितेत जसे यमक, ओघवती रचना, लयबध्दता बघावयास मिळते तशीच भलरी गीतांतही रचना पहावयास मिळते. भलरीत दोन ते पाच कडव्यापर्यंत रचना तर कधी दीर्घ काव्याप्रमाणे दिर्घ रचनाही आढळते. काही लोकगीतांत चार ओळींचे कडवे आहे, तर काही लोकगीतांत केवळ दोनच ओळीचे कडवे अशी रचनाही या गीतांची आढळून येते. शेवटी यमक साधण्याचा अटोकाट प्रयत्न केलेला दिसून येतो. असे असले तरी त्यात जाणीवपूर्वक ओढाताण केलेली आढळत नाही. जे काही यमकादी शब्द येतील ते अतिशय चपखलपणे, अर्थपूर्ण आणि अपरिहार्यपणे आलेले आपल्याला दिसतात.

भलरी लोकगीतांचे संकलन करणे आज जिकीरीचे झाले आहे. सरोजिनी बाबर यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळ आणि आकाशवाणी पुणे केंद्रावर कार्यरत असताना मोठया प्रमाणात लोकसाहित्याचे संकलन केलेले आहे. त्यात ‘भलरी’चे स्थान अधोरेखित करण्यासारखे आहे. त्यांच्या ‘एक होता राजा’ या ग्रंथात संकलित केलेली काही भलरी लोकगीते महत्त्वपूर्ण आहेत. यांनी विविध भागातील लोकांकडून मिळवलेली भलरी गीते हा संकलनाचा उत्तम नमुना म्हणता येईल.

भलरी लोकगीतांचे संकलन करताना एक तर ती केव्हा, कधी आणि कोठे म्हटली जातात याचा आपल्याला सेन्स असला पाहिजे. आज भलरी लोकगीते लुप्त झाली आहेत, अशी ओरड ऐकायला मिळत असली तरी त्यात शंभर टक्के तथ्य नाही हे ही तितकेच खरे. धोरतावाला बाबा आणि लुकडयावाली बाई आज तरी भलरी म्हणतात. त्यासाठी आपल्याला ग्रामीण भागात जाऊन शोध घ्यावा लागतो. विषेषतः गहू, ज्वारी आणि बाजरी काढणीच्या वेळी भलरी म्हटल्या जातात. या सुगीच्या काळात तिथं जाऊन त्या शेतक-यांना मी तुमच्यातलाच एक आहे, मीही शेतकरीच आहे आणि मला तुमच्याबरोबर ज्वारी, बाजरी काढायची आहे. आपण गाणं म्हणून ज्वारी, बाजरी काढूयात का? असं म्हणत मी गाणं (भलरी) म्हणून लागताच ही भली माणसं मोठया उत्साहाने भलरी म्हणत आपल्यात सामील होतात, हा माझा अनुभव.
अशावेळी आपण आपला रेकॉर्डर नकळत ऑन करून भलरी रेकॉर्ड करणे आज संकलनाचा उत्तम नमुना म्हणून पहाता येईल.

लोकगीतांचे विषेषतः भलरी लोकगीतांचे संकलन हे पूर्णतः क्षेत्रीय संशोधन पद्धतीचा एक अविभाज्य भाग आहे. काळानुरूप श्रेत्रीय संकलनात आगेमागे आलेले सण, उत्सव यांचा प्रभाव भलरी गीतांमधून दिसून येतो. भलरी लोकगीतांचे संकलन करताना हाडाचा शेतकरी असेल तरच तो तुम्हाला मूळ भलरी सांगेल, अन्यथा तुमच्या हाती काहीच लागणार नाही. नाहीतर त्यात इकडच्या तिकडच्या गाण्यांच्या, इतर लोकगीतांच्या ओळी आल्याशिवाय राहणार नाहीत. तशी तुम्हाला युटयूब किंवा विकिपीडियावरही मूळ भलरीविषयी काहीच माहिती मिळणार नाही, जी काही मिळेल ती व्यावसायिक कंपन्यांनी एखाद्याच्या स्वरचित गाण्याला शेवटी भलरी, भलकडी दादा म्हणत आम्ही शेतीप्रधान संस्कृतीचा उदोउदो करणारे वारसदार असल्याचा दावा करणारे बनेल आणि प्रसिद्धीलोलूपही खूप पहायला मिळतील. जुने मराठी चित्रपट वा इतर अल्प ठिकाणीच नकळत लिखित स्वरूपात मूळ भलरी दिसून येते. याविषयी अधिक माहितीसाठी जाणकारांनी यूटयूबवर https://youtu.be/Ycr7Ji6iyAI gh fyad fdaok #Bhalari Folksong Documentry by Dr. Sandeep Ratan Kamble 28 03 16 8 vls lpZ djk;yk gjdr ukgh- eh fo|kokpLirh inohlkBh tks izca/k lknj dsyk vkgs] त्यावेळी अकरा मिनिटांची डॉक्युमेन्ट्री तयार केली होती, तीच युटयूबवर आपल्याला पहायला मिळेल.

भलरी लोकगीते ही नानाप्रकारची सुरावटी ल्यालेली असल्यामुळे ‘भलरी’ लोकगीतांचे विविधांगी प्रकारात वर्गीकरण करता येते, ते वर्गीकरण असेः

१. सामाजिक विषय हाताळणारी भलरी लोकगीतः

आगं चाल चाल साळुबाई गं, साळी निंदायला जाऊ
आगं साळी निन्ता-निन्ता, तिथं घावला ससा,
अगं सशाचा रसा, अन् लागतो कसा,
चावट/येडगळ बाम्हण गं, मेला/मला पुसतो कसा

२. राजकीय विषय हातळणारी भलरी लोकगीत :

सन ७७ साली,
सत्ता बाईच्या हातात आली,
हे राज्य मिळवण्यासाठी,
आपणा आपणात भांडण झाली,
अरे चरणसिंगा तू नासक्या हिंगा,
देश तुला रागवला,
अहो नांगरावाले, चरक्यावाले,
बिऱ्हाड तुम्ही हो आवरा

 ३. पौराणिक संदर्भांशी नाते सांगणारी भलरी लोकगीतः

बुद्धाचा बाग हिरवागार,
डांळबाला आलाय बार,
अन् वाकडी टोपी, सरळ भांगावरी गं,
टाकलं डोकंबाई बुद्धाच्या चरणावरी गं



४. आध्यात्मिक किंवा भक्तीभाव वर्णन करणारी भलरी लोकगीतः

साळू तिथं बाळू,
चंद्रभागा पाणी तुझं नेवाशाची वाळू,
अभीर बुका घ्या घ्या,
देवाजीच्या दर्शनाला, रस्ता मला द्या द्या



५. शृंगाराविष्कार करणारी भलरी लोकगीतः

नवरा बायकोची जोडी,
काढिती जवारी, हात उचला राया
मी म्हणंते भलरी,
अगं तुझी माझी जोडी, बघतो सारा गाव
तू माझी मस्तानी, मी तुझा बाजीराव

६. कौटुंबिक जीवनाचा भावाशय व्यक्त करणारी भलरी लोकगीतः

मम्बई घोडेगावचा पेढा,
खावा थोडा थोडा,
माहेराला धाडा गं,
माहेराला धाडा



७. व्यथा, वेदना, दारिद्री जीवनाचे चित्रण करणारी भलरी लोकगीत :

आम्ही भाग्याचे रे भाग्याचे,
आमचे तांबे भोपळ्याचे,
लोकाघरी हांडे भांडे रे, लोकाघरी हांडे भांडे,
आमच्या घरी परूळतांबे,
आम्ही भाग्याचे रे भाग्याचे
भलरी दादा, भलरं



८. विनोदीवृत्तीचे चित्रण करणारी भलरी लोकगीतः

ऐठन केली पैठण केली, सुंदर बायको मिळेचना,
गेलो पिपरी, आणली एक झिपरी,
तिचं अन् माझं जमेचना,
इकडून तिकडून झालं एक कार्ट,
ते काय बाबा म्हणेचना



९. जीवनाचे उपहासात्मक चित्रण करणारी भलरी लोकगीतः

जनी का मनी,
रंग नाय कालच्यावाणी,
जनी सुकून गेलीय गं,
आळूच्या पानावाणी



१०. कृषिसंस्कृतीचे वस्तुनिष्ठ दर्शन घडविणारी भलरी लोकगीतः

रामा हो, रामा, रामा.
रामाच्या बागामधी, हो बागामधी,
चाहूर मोटा दोही, हो मोटा दोही,
कोण हाकीतो हौशा धनी हो, हौशा धनी,
संत्र्याला जातं पाणी हो, झुळझुळवाणी

वरील रचनाबंध पाहता भलरी लोकगीत रचनाप्रकारात सलगता दिसून येत नाही. कडव्याच्या शेवटी ‘भलरी दादा’ किंवा ‘भलकडी दादा’ हे शब्द येतीलच असेही नाही आणि आलेच तर ते सूर लांबून म्हटले जातात. ही गीते लिखित रचनाबंधात मांडताना त्यात पुनरावृत्ती झाल्यामुळे थोडी वेगळी वाटत असली तरी गाताना हा रचनाबंध अपरिहार्य आहे, हे लक्षात येते. भलरी लोकगीतांची रचना ही ‘मुक्तछंदा’तील रचनाबंधाशी साम्य सांगणारी आहे. किंबहुना ही मुक्तछंदाचीच एक रचना आहे. मुक्तछंदात्मक रचना हे भलरी लोकगीतांचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यो सांगता येते.

सर्वसाधारणपणे भलरी लोकगीतांची रचना लक्षात यावी म्हणून त्या त्या आशयानुरूप केवळ एक कडवे वर नमूद केले आहे. संकलनकर्त्याने भलरी लोकगीतांचे अचूक वर्गीकरण करून मांडणी करणेही अत्यंत आवश्यक आहे. काही लोकगीते ही विविधांगी प्रकारात वर्गीकृत होत असतात त्याचाही यथोचित ठिकाणी संकलन कर्त्याने आढावा घेणे गरजेचे असते. उपरोक्त असे तेरा ते चौदा प्रकारात भलरी लोकगीतांचे वर्गीकरण करता येते. त्यात कमी-अधिकपणा संभावू शकतो.

भलरी म्हणणारा शेतकरीवर्ग आहे आणि हा वर्ग निरक्षर आहे. त्यामुळे प्रमाण भाषेतील शब्द त्याला जसेच्या तसे उच्चारता येतीलच असे नाही. तर तो बहुतांदा अपभ्रषांत्मक शब्दच उच्चारतो. उदा. बातम्या ऐवजी ‘बातन्या’, मुंबई ऐवजी ‘ममई’, 'सापडला ऐवजी ‘घावला’ असे शब्द येतात.

आपण भलरी लोकगीतांचे संकलन करीत असताना या निरक्षरवर्गांच्या बोलीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, किंबहुना त्यांच्या बोलीतील शब्द प्रमाणभाषेत मांडूनही चालणार नाहीत. अशा लोकगीतांचे संकलन करीत असताना मूळ आहे तसे प्रमाण-बोली जसे आहे तसे जाणीवपूर्वक मांडणे हे संकलनकर्त्याचे आद्य कर्तव्य बनते. त्याने ‘ध’ चा ‘मा’ करू नये म्हणजे झालं.



भलरी लोकगीतः संशोधन आणि आव्हानेः

लोकगीतांचे संशोधन करणे तसे आव्हानात्मक काम असते. विषेषतः भलरी लोकगीतांवर संशोधन करणे हे अधिक आव्हानात्मक काम आहे. त्याचे कारण असे की, स्थल-कालानुरूप भलरी लोकगीतांत येणारी भाषा, संदर्भ गावोगावी, मैलोमैल बदलत असतात. भलरी लोकगीते कोणत्या जाती-प्रवर्गातील स्त्री-पुरुषांनी गायली असा जातीव्यवस्थेचा बारकाईने विचार करून संशोधन केल्यास त्या संशोधनाला वेगळीच कलाटणी मिळते. असे संशोधन होणे आज काळाची गरज असली तरी ते आव्हानात्मक काम आहे. अशा वेळी आपल्याला बारकाईने जातीव्यवस्थेचा अभ्यास करून तसेच समाजव्यवस्थेची सामाजिक उतरंड लक्षात घेऊन भलरी लोकगीतांचे संशोधन करावे लागते, आणि ते मात्र आव्हानात्मक काम आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर, मी भलरी लोकगीतांचे संशोधन करीत असताना एक आजीबाई भलरीमध्ये राम, लक्ष्मण, कृष्ण यांचे दाखले देत होत्या तर दुस-या आजीबाई गौतमबुध्द, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संदर्भ देत होत्या. मी पुन्हा पहिल्या आजीबाईला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बुद्ध यांची नावे असलेली भलरी सांगितली, तर त्या आजीबाई चक्क म्हणाल्या, ‘‘भाऊ ती महारा-मांगांची भलरी आहे, आपली नाही. त्यामुळं मी ती म्हणत नाही.’’ आता अशावेळी भलरी तीच मग आता कोणाचे बरोबर गृहीत धरायचे आणि का? असे आव्हानात्मक काम संशोधकापुढे मोठे आव्हानच निर्माण करते. येथे मात्र संशोधकाला जशी समाजषास्त्रीय अभ्यासाची बैठक असावी लागते, तशीच ती मानसशास्त्रीय अभ्यासाचीही असावी लागते, अन्यथा तुम्हांला या गीतांमधून येणारे ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेता येणार नाहीत. हे यथायोग्य मूल्यमापन करता आले नाही तर त्यामुळे तुम्ही एकतर आपला इतिहास गमावून बसाला, नाहीतर इतिहासाची पाने पलटून पुर्नःसंशोधन तरी करायला तरी प्रवृत्त कराल, यात शंका नाही.

सगळयात मोठे आणि महत्त्वाचे आव्हान म्हणजे मीडिया प्रदूषणाचे आहे. सुमित कॅसेटस् असतील किंवा तत्सम रेकॉडिंग कंपन्या असतील यांनी एकेकाळी शेतकरी गीतांच्या नावाखाली भलतेच गाणी ‘भलरी’ असल्याचे लोकांच्या गळा उतरविली. त्यामुळे कोणतेही शेतकरी गीत आणि त्यात ‘भलरी’ हा शब्द आणला म्हणजे झाली भलरी. त्यांनी निर्माण केलेला हा चुकीचा भ्रम थांबविणे, हे सगळयात मोठे आव्हान आज तुम्हा-आम्हा समोर आहे.

भलरी लोकगीतांचे संशोधन करताना अशी एक ना अनेक मोठी आव्हानात्मक कामे आहेत, अभ्यासकांनी/संषोधकांनी त्याची लिलया जबाबदारी पार पाडणे अत्यंत गरजेचे आहे.

भलरी लोकगीतात प्रतिमा, प्रतिकेही येतात. उदा.
नगरच्या किल्ल्यावर बसलाय बगळा,
रंग याचा येगळा, भलरी दादा

या वरील ओळीत अहमदनगरच्या भुईकोट किल्यावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित झाल्यानंतर झालेले संक्रमन यांची नोंद घेण्यासाठी इंग्रजांना ‘बगळा’ ही प्रतिमा वापरली आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे, नाहीतर अर्थाचे अनार्थ होऊ शकतात. त्याचे यथार्थपणे मूल्यमापन होणे गरजेचे आहे, ही आणि अशी बरीच आव्हाने लोकगीतांच्या संकलनात अडथळा म्हणून उभे आाहेत.

समारोपः

मराठी वाड्ःमयाचा अभ्यास करत असताना ‘भलरी आणि कविता’ यांचा साधारणतः १९९० पर्यंतच्या धांडोळ्यात ‘भलरी लोकगीत आणि ग्रामीण कविता’ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, या निष्कर्षाप्रत आपण येऊन पोहोचतोत. फरक एवढाच की, ग्रामीण कविता, दलित साहित्य आणि ग्रामीण साहित्य चळवळी ही प्रेरणेनेच्या बळावर वाढत आहे, तर भलरी लोकगीते ही मूळताः अस्सल लोकगीते आहेत. त्यांची निर्मिती ही निरक्षरांची अलौकिक निर्मिती म्हणून त्याकडे पाहिले जाते, तर ग्रामीण कवितेकडे कवींची लक्षणीय निर्मिती म्हणून पाहिले जाते. असे असले तरी ग्रामीण कवितेच्या आयामाचा अंदाज घेता, लय, रचना, प्रतिमा, प्रतिके, शेतकऱ्यांचे भावनिक, सांस्कृतिक मूल्यमापन या अंगाने विचार करता ही कविता भलरी लोकगीतांच्या पायावर उभी आहे, असे ठामपणे सांगता येते. मात्र त्यातील संकलन, संशोधन, त्याचा अभ्यास हे आव्हानात्मक पद्धतीने पेलने खूप गरजे आहे.

------------------------------------------------

संदर्भः

१. http://www.maharashtratourism.net/culture-lifestyle/music/folk-music.html

२. राजू पवार या मित्राशी सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मराठी विभागात झालेल्या चर्चेतून.

३. संदीप राठोड, नागलवाडी, (लमान तांडा) ता. शेवगाव, जि. अहमदनगर येथील शेतकरी मित्राशी केलेल्या संवादातून.

४. खोकन पात्र, जि. मिदनापूर (पूर्व, पश्चिम बंगाल) या बंगाली शेतकरी मित्राशी केलेल्या संवादातून.

५. अब्दुल सलाम, मु. पो. टेंगोरे, ता. अजमनगर, जि. कठियार (बिहार) येथील मित्राशी केलेल्या संवादातून.

६. प्रमोद कुमार, जि. कांगडा, (हिमाचल प्रदेश) या मित्राशी केलेल्या चर्चेतून.

७. आनंद यादव, ‘ग्रामीण साहित्यः स्वरूप आणि समस्या’, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे 1984, पृष्ठ 131.

८.   https://youtu.be/Ycr7Ji6iyAI

---------------------------------------------------------------

डॉ. संदीप रतन कांबळे

मराठी विभाग,

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,

पुणे-411007

मोबा. 9823808736

मेलः sandipk07@gmail.com




1 टिप्पणी: