सोमवार, ५ ऑगस्ट, २०१९

रॅमन मॅगसेसे पुरस्कार: एका कार्यकर्ता पत्रकाराचा सन्मान

रवीशजी
रवीशजी यांना आशिया खंडातील सर्वोच्च रॅमन मॅगसेसे पुरस्कार नुकताच जाहीर झाला. वस्तुतः हा पुरस्कार सामाजिक कार्यासाठी दिला जातो. भारतातील अनेक जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांना तो मिळालेला आहे. यंदा एका पत्रकाराला हा पुरस्कार जाहीर होणं ही विशेष बाब आहे. 
अनेक पत्रकार न्यायाच्या, समतेच्या चळवळींना शक्य तितक पाठबळ कायम देत असतात. त्यांच्यातले कार्यकर्तेपण सतत जागे असते. रवीश यांच्या अशाच कार्यकर्त्या पत्रकारितेचा हा गौरव आहे. 
दिल्लीतील तसेच देशभरातील बहुतांश मीडिया सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुले बनत चालली असताना रवीश यापासून दूर राहिले. काहीही झाले तरी ते सत्य बोलत आणि मांडत राहिले. प्रश्नांना भिडणारी, त्यांची उत्तरे शोधणारी पत्रकारिता ते करीत आहेत. त्यांच्या एनडी टिव्ही समूहाने त्यांना यासाठी पाठबळ दिले हे ही तितकेच महत्त्वाचे आहे.
सध्या देश कठीण काळातून जातो आहे. खुलेआमपणे माहिती अधिकार कायद्याचा गळा घोटला गेला, त्याविरोधात आम्ही काहीच करू शकलो नाही. पाशवी बहुमताने सरकार सत्तारूढ झाले आहे. विरोधी पक्षांचे अस्तित्त्व क्षीण होत चालले आहे. सीबीआय, ईडी, पोलीस या यंत्रणांचा सराईतपणे गैरवापर सुरू आहे.
यावेळी रवीशजींना रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळणं मोठं आश्वासक आहे. त्यांच्याप्रमाणेच देशभर कार्यकर्ता पत्रकाराची जबाबदारी निभावत असलेल्या शेकडो पत्रकारांची उमेद वाढवणारी ही बाब आहे. यापासून प्रेरणा घेऊन देशभर असंख्य रवीश कुमार तयार होवोत, हीच सदिच्छा!
---------------------------------------------------
- दीपक जाधव/
मुख्य बातमीदार, पुढारी, पुणे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा