लेख वाचण्यासाठी अपेक्षित वेळ: ०४ मिनिटे
योगेश पवार
जीवन-विमा हा प्रत्येकाच्या आर्थिक नियोजनातील एक महत्वाचा घटक आहे. परंतु ब-याच व्यक्ती विमा पॉलिसी घेणे म्हणजेच गुंतवणूक करणे, असा गैरसमज करुन घेत असतात. आपणही विम्याला गुंतवणूक म्हणून पाहत असाल तर सावधान.
या लेखाच्या पूर्वार्धात विमा पोलिसी ही आपली गुंतवणूक नाही, याविषयी माहिती घेणार आहोत.
मला हल्लीच एक मेसेस आला होता. त्यात असे लिहिले होते की ‘गेल्या वर्षी, ‘मी रु.२ लाखाची गुंतवणूक केली होती पैकी रु.८०,०००/- मी विम्यात गुंतवले होते.’ ह्या एकाच वाक्यामुळेच मला हा लेख लिहावा असे वाटत आहे. तसे पाहिल्यास या मेसेज मध्ये विशेष असे काहीच नाही. कारण मला नेहमीच गुंतवणुकीबाबत सल्ला विचारणारे मेसेज येतच असतात. परंतु येणा-या बहुतांशी मेसेज मधील मानसिकता ही अशीच असते, हे खरंच चिंताजनक आहे.
सर्वच माध्यमातून येणा-या जाहिराती व प्रभावी विक्रीतंत्रच या अशा मानसिकतेला कारणीभूत असते. तसेच सर्व विमा कंपन्यांचे एजंट लोकांच्या मनात असा ग्रह करुन देत असतात, की “तुम्ही अमुक एक रकमेचा मासिक/त्रैमासिक/वार्षिक विमा हप्ता भरुन तुमचे भविष्य सुरक्षित करा, तुम्हाला अमुक एक वर्षानंतर एवढी रक्कम मिळेल, परत जर काही अघटीत घडले तर वारसाला एवढी रक्कम मिळेल, शिवाय तुम्हाला कलम ८०-सी अंतर्गत आयकरात सुटही मिळेल”, असंच काहीतरी तुमचा एजंट वर्षानुवर्षे तुम्हाला सांगत असतो व यालाच बळी पडून तुमचा असा समज होतो की विमा काढणे ही फारच चांगली गुंतवणूक आहे.
पूर्वी विमा विकताना एजंट–एजंट मध्ये स्पर्धा असायची. कारण यातून मिळणारे कमिशनचे व विविध लाभ, जसे की अमुक एक टार्गेट पूर्ण केले की काही वस्तु, सोने, गाडी, परदेशदौरा इ. हेही एक कारण होते व आहे. पूर्वी विमा कंपन्यांच्या जाहीराती फारच कमी प्रमाणात केल्या जात असत मात्र सध्यातर अनेक विमा कंपन्या बाजारात असल्यामुळे त्यांच्यातही व्यावसाईक स्पर्धा एवढी वाढली आहे की, त्याना विविध प्रकारच्या माध्यमातून सतत जाहीराती कराव्याच लागतात. हा सततचा होणारा भडिमार हेही ‘विमा म्हणजे गुंतवणूक’ असे समजण्यामागे आहेच.
एका सर्व्हेनुसार तीन वर्षापूर्वी जेवढ्या जाहीराती विमा कंपन्या करत होत्या त्यात आता जवळपास ८ पट वाढ झालेली आहे. तसे पाहिल्यास सध्याच्या जगात ह्यात गैर असे काहीच नाही. कारण हा काळच मुळी स्पर्धेचा आहे व स्पर्धा म्हटली की सारे काही माफ. पण ह्यामुळे पुरेसा विमा घेऊन आपल्या वारसांचे जीवन सुरक्षीत केलेले आहे असा लोकांचा गैरसमज होतो. प्रत्यक्षात मात्र खेदाने असे नमूद करावेसे वाटते, की विम्याचा हा जो असा प्रचार व प्रसार केला जात आहे, तोच मुळी चुकीचा आहे; आणि म्हणूनच हाच मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, कारण विमा कंपन्यांमध्ये जमा केला जाणारा हप्त्याच्या रुपातील पैसा हा, विमा संरक्षणासाठी कमी व गुंतवणूक म्हणून जास्त प्रमाणात केला जातो. ह्याचे सर्वात महत्वाचे व प्रमुख कारण जर कोणते असेल तर गेल्या अनेक पिढ्यांपासून, विमा एजंट या जमातीने असा एक भ्रम सार्वत्रिकरित्या पसरवलेला आहे की ‘टर्म इन्शुरन्स’ विकत घेणे म्हणजे निव्वळ मुर्खपणा आहे, कारण यात भरलेले पैसे तुम्हाला कधीच हयातीत परत मिळत नाहीत. हे असं का घडतं? तर तुमच्या मागे नेहमीच कोणता ना कोणता विमा एजंट तुम्हाला गाठून तुम्हाला ‘विमा ही कशी चांगली गुंतवणूक आहे?’ हे तुमच्या कानीकपाळी ओरडत असतो. काही वेळा ही ब्याद आपल्याकडे नको म्हणून काही व्यक्तीच तुमचा रेफरन्स त्याला देत असतात. मात्र तुम्हाला विमा विकताना तो स्वत:हून कधीच ‘टर्म इन्शुरन्स’ बद्दल चकार शब्दसुध्दा बोलत नाही. उलट जर तुम्ही याबाबत त्याला काही विचारले, तर तो तुम्हाला लगेच असे निदर्शनाला आणून देतो की यातून तुम्हाला काहीच परत मिळणार नाही. आणि निश्चितच तुम्ही ज्यातून आपल्याला काहीच जर मिळणार नसेल तर कशाला ‘टर्म इन्शुरन्स’ विकत घ्यावयाचा असा विचार करुन तीच विमा पॉलीसी विकत घेता ज्यातून तुम्हाला काही वर्षानंतर पैसे परत मिळणार असतात. इथे तो एजंट मनात खुश होत गालातल्या गालात हसत असतो, “कसं मी बरोबर पटवल! आता मला पहिल्या वर्षी एवढे कमीशन मिळेल व नंतर अमुक-अमुक वर्षे मला नियमित एवढे-एवढे वार्षिक कमिशन मिळत राहील.” थोडक्यात त्याने तुम्हाला कसे गंडवले हे कधीच कळत नाही.
आता तुम्ही विचाराल की ‘या प्रकारच्या पारंपरिक विमा पॉलिसीतून काही फायदा असतो की नाही?’ तर निश्चितच असतो, पण यातील सर्वात जास्त फायदा हा त्या एजंटला असतो, ज्याने तुम्हाला हा विमा विकलेला असतो. याचे प्रमुख कारण असते ते म्हणजे विमा एजंटने केलेली तुमची मानसिक अवस्था, ज्यामुळे तुम्ही तो विकत घेता. विमा एजंट याला बहुतांशी ‘Life’ संबोधत असतात. येथेच तर सारी गल्लत आहे. ‘Life’ जेव्हा असा विचार करतो की, आपल्याला अमुक एवढे विमा संरक्षण मिळाले आहे, त्याचवेळी विमा एजंट व विमा कंपनी मात्र त्यांच्यासाठी विमा हप्ता हे पैसे मिळवण्याचे एक माध्यम समजत असतात. या वेळी ‘Life’ मात्र विचार करत असतो की जर माझा अचानक मृत्यु झाला, तर माझ्या पत्नीला/पतीला किंवा अन्य वारसाला रु.२० लाख मिळतील जे त्यांचेसाठी पुरेसे असतील. एकदा का ‘Life’ च्या आयुष्याची (Life) किंमत गळी उतरवली की तो एजंट त्याच्या मनातील ‘टर्म इन्शुरन्स’ चा कीडा अलगद बाजूला करण्यात यशस्वी होतो आणि त्याबदल्यात तो विकत असतो एक अतिशय खर्चिक विमा पॉलिसी.
उद्याच्या उत्तरार्धात जाणून घेऊयात विमा पॉलिसीत गुंतवणूक करताना कोठे गुंतवणूक करावी आणि काय काळजी घ्यावी.
---------------------------------------------------
- योगेश पवार
(Pawer Financial Services, Ahmednagar)
84 84 84 32 26 / 94 04 82 26 59
---------------------------------------------------
आपल्या कशी शंका असल्यास आपण थेट लेखकाशी संपर्क साधू शकता.
मित्र हो,
हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका.
हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका.
हा लेख जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा.
उद्या भेटू यात जागल्याच्या लेख मालिकेत...
------------------------------------------
आपल्या काही सूचना असतील तर खालील मेलवर नक्की आम्हाला काळवा.
mejagalya@gmail.com
आमच्या 'जागल्या' व्हाट्सअप समूहामध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/IogFFXsbTDq5xG5AiybtEf


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा